सांगली : शहरातील नळभाग परिसरात बेकायदेशीरपणे जमाव जमवून महिला पोलिसांशी हुज्जत घातल्याप्रकरणी गुन्हा दाखल झालेल्या असिफ बावा याचा पोलिसांकडून शोध सुरू आहे. शासकीय कामात अडथळा यासह इतर गुन्ह्यात अटकेची कारवाई टाळण्यासाठी उच्च न्यायालयातही बावाचा जामीन अर्ज फेटाळल्याने आता त्यास अटक होणार आहे. शहर पोलिसांनी त्याचा शोध सुरू केला आहे.
गेल्या महिन्यात शहरातील नळभाग परिसरात दोन व्यक्तींमध्ये भांडण चालू असताना ते सोडविण्यासाठी महिला पाेलीस कर्मचारी आली होती. यावेळी संशयित बावा हा तिथे येऊन त्याने जमाव जमवून पोलिसांशी हुज्जत घातली होती तर, जमावातील एकाने महिला पोलिसाशी धक्काबुक्कीही केली होती. त्यानंतर बावा याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला होता. अटकेची कारवाई टाळण्यासाठी उच्च न्यायालयात अर्ज केला होता. बुधवारी तो फेटाळण्यात आल्याने आता त्याला अटक करण्यासाठी पोलिसांकडून त्याचा शोध सुरू आहे.