सांगली : जिल्ह्यातील कोरोनास्थिती स्थिर हाेत असल्याने लागू करण्यात आलेल्या नियमानुसार सुरू असलेल्या वीकेंड लॉकडाऊनवर पोलिसांची नजर असणार आहे. अत्यावश्यक सेवा वगळता इतर व्यवसाय सुरू असल्यास त्यांच्यावर कारवाईसाठी पोलिसांनी शहरात गस्त सुरू केली आहे. वीकेंड लॉकडाऊनचा शनिवारी पहिलाच दिवस असल्याने गर्दी दिसून आली तरी रविवारी दुकाने बंद करण्याच्या सक्त सूचना पोलिसांनी दिल्या.
पॉझिटिव्हिटी रेटमुळे जिल्ह्याचा तिसऱ्या स्तरात समावेश आहे. त्यानुसार सोमवार ते शुक्रवार दुपारी चारपर्यंत सर्व व्यवहारांना परवानगी देण्यात आली आहे, तर शनिवार व रविवारी लॉकडाऊन असणार आहे. त्यामुळे अत्यावश्यक सेवा वगळता इतर व्यवसायास परवानगी असणार नाही. शनिवारी दुपारपासून पोलिसांनी शहरात पेट्रोलिंग करत सुरू असलेली दुकाने बंद करण्यास सांगितली व रविवारीही बंद ठेवावीत, अन्यथा कारवाईचा इशारा दिला. पोलिसांनी सुरू केलेल्या गस्तीमुळे अनेक दुकाने पटापट बंद झाली व रस्त्यावरील गर्दीही कमी झाली होती.