सांगली : कोरोनाच्या वाढत्या संसर्गामुळे लागू करण्यात आलेल्या वीकेंड लॉकडाऊनला शहरासह ग्रामीण भागात प्रतिसाद मिळाला. शुक्रवारी रात्री आठपासूनच पोलीस संचारबंदीच्या अंमलबजावणीसाठी रस्त्यावर होते. शनिवारीही सकाळपासून प्रमुख चौकात पोलीस बंदोबस्त तैनात होता. संचारबंदी असतानाही विनाकारण बाहेर फिरणाऱ्यांवर कारवाई करण्यात आली.
कोरोनाच्या संसर्गामुळे लागू करण्यात आलेले कडक निर्बंध व लॉकडाऊनची कडक अंमलबजावणी करण्याचे निर्देश पोलीस अधीक्षक दीक्षित गेडाम यांनी दिले होते. त्यानुसार पोलीस पथकांनी दिवसभर ठिकठिकाणी थांबून लाॅकडाऊनबाबत आवाहन केले होते. जे नागरिक घराबाहेर अथवा चौकात थांबून होते त्यांना घरी जाण्याबाबत आवाहन करण्यात येत होते. तर हुल्लडबाजी करणाऱ्या तरुणांवर कारवाई करण्यात आल्याने सर्वत्र शुकशुकाट जाणवत होता.
सांगली ग्रामीण भागात पोलीस निरीक्षक चंद्रकांत बेदरे यांच्या मार्गदर्शनाखाली २३ पोलीस तर ७ होमगार्ड बंदोबस्तावर होते. अंकली फाटा, बुधगाव, लक्ष्मी फाटा आदी ठिकाणी पोलीस तैनात होते.
शहरातही प्रमुख चौकात पोलीस बंदोबस्त होता. दुचाकीवरून फिरणाऱ्यांना थांबवून चाैकशी केली जात होती. त्यात विनाकारण फिरणारा आढळल्यास त्याच्यावर कारवाई करण्यात येत होती.
पोलिसांकडून डबल सीट फिरणे, विनामास्क फिरणे, जमाव करून थांबणाऱ्या व दारूबंदी असतानाही त्याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई करण्यात आली त्यात दुपारपर्यंत शहरात ६९ जणांवर कारवाई करत १५ हजारांचा दंड आकारण्यात आला.
चौकट
विनाकारण फिरणाऱ्यांना दंड
संसर्ग टाळण्यासाठी कडक लॉकडाऊन लागू केला असतानाही अनेक नागरिक शहरात फिरत होते. पोलिसांनी त्यांना अडवून त्यांच्याकडून दंडाची वसुली केली. सायंकाळी काही तरुणही बंदी आदेश असतानाही दुचाकीवर फिरत होते. वाहतूक पोलिसांनी त्यांच्यावरही कारवाई केली.
चौकट
क्रिकेट खेळणाऱ्या तरुणांची विकेट
संचारबंदी आदेश लागू असतानाही जिल्हा परिषदेजवळ असलेल्या मैदानावर क्रिकेट खेळणाऱ्या तरुणांवरही पोलिसांनी कारवाई केली. नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर शहरातील उपनगरात कारवाई सुरूच होती.