----
सांगलीतून दुचाकी लंपास
सांगली : शहरातील नेमिनाथनगर परिसरातून अज्ञाताने २० हजार रुपये किमतीची दुचाकी लंपास केली. याप्रकरणी अमिरज हमजा मुलाणी यांनी विश्रामबाग पोलिसांत फिर्याद दिली आहे.
नेमीनाथनगर येथील चंद्रिका अपार्टमेंटमध्ये मुलाणी राहण्यास आहेत. सोमवारी (दि. १७) रात्रीच्या सुमारास अज्ञाताने दुचाकी लंपास केली. विश्रामबाग पोलीस पुढील तपास करत आहेत.
----
पंधरा टक्के उपस्थितीमुळे कामकाजात अडचणी
सांगली : कोरोना संसर्ग रोखण्यासाठी सुरू असलेल्या लॉकडाऊनमध्ये शासकीय, खासगी कार्यालयातील उपस्थिती १५ टक्के करण्यात आली आहे. त्यामुळे त्याचा कामकाजावर परिणाम होत आहे. बहुतांश कर्मचारी हे ‘वर्क फ्रॉम होम’ करत असतानाही इतर ठिकाणी अडचणी येत असल्याने आता लॉकडाऊनमध्ये शिथिलता देण्यात आल्यानंतर किमान ५० टक्के कर्मचाऱ्यांच्या उपस्थितीत कामकाज सुरू करण्याची मागणी होत आहे.
----
पोलीस अधीक्षकांकडून नदीपात्रात पाहणी
सांगली : लवकरच मान्सूनची चाहूल लागणार असल्याने संभाव्य पूरस्थितीमध्ये करावयाच्या उपाययोजनांच्या पाहणीसाठी पोलीस अधीक्षक दीक्षित गेडाम यांनी पाहणी केली. अधीक्षकांनी बोटीद्वारे नदीपात्रात फेरफटका मारून पाण्याची पातळी, पाणी वाढल्यानंतर करावयाचे नियोजन याबाबत प्रशासनाकडून माहिती घेतली. पोलीस उपअधीक्षक अजित टिके यावेळी उपस्थित होते.
----