'सांगली/इस्लामपूर : इस्लामपूर येथे पिस्तूल विक्री करण्यासाठी आलेल्या दोघांना अटक करण्यात गुंडाविरोधी पथकास सोमवारी दुपारी यश आले. विजय नंदकिशोर सेन (वय १९, रा. कालोनी, ता. बामोरी, जि. गुना, मध्य प्रदेश) व विकास प्रकाश मगदूम (२४, सिद्धनेर्ली, ता. हातकणंगले, जि. कोल्हापूर) अशी त्यांची नावे आहेत. त्यांच्याकडून गावठी बनावटीचे एक पिस्तूल व तीन जिवंत काडतुसे जप्त करण्यात आली आहेत. यातील सेन हा मुख्य तस्कर असल्याचे निष्पन्न झाले आहे.सेन व मगदूम हे दोघे इस्लामपुरातील बसस्थानक परिसरात पिस्तूल व जिवंत काडतुसांची विक्री करण्यास येणार असल्याची माहिती गुंडाविरोधी पथकाला मिळाली होती. पथकाचे सहायक पोलीस निरीक्षक जितेंद्र शहाणे, हवालदार सुनील भिसे, श्रीपती देशपांडे, गुंड्या खराडे, महेश आवळे, सागर लवटे, नीलेश कदम, संजय कांबळे, वैभव पाटील, पप्पू सुर्वे, संतोष पुजारी, दिलीप हिंगाणे यांचे पथक दुपारी तीन वाजता सापळा रचून तयारीत होते. मिळालेली माहिती व संशयितांच्या वर्णनावरून सेन व मगदूम या दोघांना ताब्यात घेण्यात आले. त्यांची झडती घेतली असता, सेनच्या कमरेला पिस्तूल सापडले. त्याच्या पॅन्टच्या खिशातून तीन जिवंत काडतुसे सापडली. त्याची किंमत पन्नास हजार तीनशे रुपये आहे. सेन हा मगदूमच्या ओळखीने येथे पिस्तूल विक्रीसाठी येतो, अशी माहिती चौकशीतून पुढे आली असल्याचे पोलिसांनी सांगितले. (प्रतिनिधी)चार काडतुसेही सापडलीसंशयितांविरुद्ध बेकायदा हत्यार बाळगल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यांना मंगळवारी न्यायालयात उभे करण्यात येणार आहे. त्यांची कसून चौकशी सुरू आहे. मगदूम हा सेनच्या संपर्कात असतो, अशी माहिती समोर आली आहे.
इस्लामपुरात पिस्तूल जप्त
By admin | Updated: May 26, 2015 00:55 IST