लोकमत न्यूज नेटवर्क
सांगली : पेट्रोल, डिझेल भरणाऱ्या अनेक वाहनधारकांच्या मनात आता इंधनाच्या मापातील पापाबद्दल शंकेची पाल चुकचुकत आहे. कमी ॲव्हरेजमुळे ही शंका अधिक बळावत आहे. अनेक मार्गांनी मापाबद्दल पंपचालकांवर नियंत्रण ठेवता येते. त्यासाठी प्रत्येक ग्राहकाने त्यांच्या अधिकाराबद्दल जागृत होणे गरजेचे आहे.
ग्राहकांना विक्री करण्यात येणाऱ्या मालात मापात पाप होऊ नये, यासाठी जिल्ह्यात वैधमापन शास्त्र विभाग कार्यरत आहे. तरीही केवळ त्यांच्यावर विसंबून राहण्यापेक्षा ग्राहकांनी जागरूकता दाखविणे आता महत्त्वाचे बनले आहे, तरच मापातील पाप थांबू शकते.
चौकट
अशी होते फसवणूक
पंपाच्या मशीनमध्येच इलेक्ट्रिक सर्किटने तयार केलेले पल्सर कार्ड बसविले जाते. ते ठराविक लिटरमागे कमी तेल सोडते. प्रत्यक्षात मीटर पूर्ण रकमेचे फिरते.
सध्या पेट्रोल-डिझेल पंप डिजिटल आहेत. मीटरवर अपेक्षित रुपयांची रक्कम दिसली, तर पुन्हा गनचा नॉब हातात धरण्याची गरज नसते. मात्र, पंपावरील कर्मचारी वारंवार अधूनमधून नॉब दाबत असतो. त्यामुळे तेल मिळत नाही, मात्र रुपयांचा आकडा फिरत राहतो.
डिजिटल पंप असूनही बऱ्याचदा रुपयांचे बटन न दाबता तेल सोडले जाते. अशावेळी १०० रुपयांऐवजी ९९.४५ किंवा अन्य कमीचा आकडा दिसतो. त्यातूनही लूट केली जाते.
चौकट
ग्राहकांनो अशी घ्या काळजी
ग्राहकांनी इंधन भरताना मीटरवरून नजर हटवू नये
प्रत्येक पेट्रोलियम कंपन्यांनी तक्रारीसाठी संकेतस्थळावर ग्राहकांना पर्याय दिले आहेत. त्याचा वापर करावा
ट्विटर हँडलद्वारे कंपनीकडे तक्रार केल्यानंतर काही वेळाने अधिकाऱ्याचा तुम्हाला कॉल येतो
पंपावर लिटरचे माप ठेवणे बंधनकारक असते. त्यातून एकदा तरी इंधन भरून वाहनात टाकण्याची सूचना कर्मचाऱ्यास करावी.
शंभर, दोनशे, पाचशे अशा सामान्य प्रमाणात इंधन न भरता १४०, २६०, ४८० अशा रेंजमध्ये इंधन भरावे.
चौकट
किती मिळते पंपचालकांना कमिशन?
सध्या पेट्रोलला प्रतिलिटर २.६३७ रुपये, तर डिझेलसाठी प्रतिलिटर २.०० रुपये कमिशन मिळते.
कोट
पंपचालकांना कायद्यानुसार लिटरचे माप ठेवणे बंधनकारक आहे. ज्या ग्राहकाला पंपावरील मापाबद्दल शंका वाटते त्याने अचानक कधीही त्या मापातून वाहनात इंधन टाकण्याची सूचना करावी. प्रत्येक ग्राहकाने एवढी सतर्कता बाळगली तरी बऱ्यापैकी नियंत्रण ठेवता येईल.
- भास्कर मोहिते, अध्यक्ष, ग्राहक पंचायत, सांगली