नॉनकोविड रुग्णालयांनी रुग्णांची अक्षरशः लूट सुरू केली आहे. कोरोना संशयित रुग्णांना चाचणी करण्याचा सल्ला न देता पैशाच्या हव्यासापोटी येथे औषधोपचार दिले जात आहेत. मात्र आजार बळावल्यावर उशिरा चाचणी केल्यामुळे केल्यामुळे संबधित रुग्णांच्या जीवितास धोका निर्माण होतो.
अशा रुग्णांकडून त्यांच्या कुटुंबियांना व त्यांच्या संपर्कात आलेल्या व्यक्तींना कोरोनाची बाधा होते. अशाप्रकारे कोरोनाचा फैलाव वाढत आहे.
कडेगाव तालुक्यातील मोजकेच डॉक्टर संशयित रुग्णांना कोरोना चाचणी करून घेण्याचा सल्ला देत प्रामाणिकपणे रुग्णसेवेचे कर्तव्य बजावत आहेत. मात्र काही डॉक्टर कोरोना संशयित व अन्य आजाराच्या रुग्णांना उपचार देत अवास्तव बिले वसूल करीत आहेत. कोरोनाच्या भीतीने घाबरलेल्या रुग्णांना ‘अंगदुखी, सर्दी, ताप, खोकला असेल तर काही नाही, व्हायरल आहे’, असे सांगत महागडी औषधे देत आहेत. कोरोनाची शक्यता व्यक्त न करणारे डॉक्टर संबंधित रुग्णांना अक्षरशः देवदूत वाटत आहेत. ज्याची प्रतिकारशक्ती चांगली आहे, असे काही रुग्ण यातून बरेही होत आहेत. यामुळे संबंधित रुग्णांचा अशा डॉक्टरांवरील विश्वास द्विगुणित होत आहे. काही रुग्णांचा आजार बळावतो आणि त्यांची कोरोना चाचणीही पॉझिटिव्ह येते. अशावेळी संबंधित डॉक्टरांचे खरे रूप लक्षात येते. मात्र कोरोना चाचणी केलेली नसल्यामुळे हे कोणाच्या लक्षातही येत नाही. तालुक्यातील बहुतांशी खासगी डॉक्टर अवास्तव आकारलेल्या उपचार खर्चाचे बिल देत नाहीत आणि रुग्णही बिलाची मागणी करीत नाहीत. यामुळे याबाबत तक्रारीही होत नाहीत.
चौकट :
...तर कायदेशीर कारवाई : तहसीलदार
कडेगाव तालुक्यातील खासगी नॉनकोविड रुग्णालयातील सर्व डॉक्टरांनी प्रामाणिकपणे रुग्णसेवा द्यावी.
कोरोना संशयित रुग्णांना चाचणी करून घेण्यास सांगावे. आपत्ती व्यवस्थापन ग्रामसमित्यांनी गावातील डॉक्टरांशी
संवाद साधून तशा सूचना कराव्यात.
डॉक्टरांच्या बेजबाबदारपणाबाबत तक्रारी आल्यास याबाबत चौकशी करून
दोषी आढळल्यास संबंधित डॉक्टरांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असे तहसीलदार शैलजा पाटील यांनी सांगितले.