जत : जत शहरातील प्रभाग क्रमांक नऊमध्ये पालिकेच्या वतीने २९ लाख रुपये खर्च करून वीर शिवा काशीद उद्यान उभारण्यात येत आहे. उद्यानाचे काम सध्या प्रगतीपथावर आहे. नगरपरिषदेच्या वतीने लवकरच लोकार्पण सोहळा आयोजित करण्यात येणार आहे, अशी माहिती नगराध्यक्षा शुभागी बन्नेनवार यांनी दिली.
जत शहरातील प्रभाग क्रमांक नऊमध्ये भाजप व राष्ट्रवादीच्या नगरसेवकांनी वीर शिवा काशीद उद्यानाचा रविवारी घेतलेला भूमिपूजन कार्यक्रम त्यांच्या नेत्यांना बोलावून वैयक्तिकरित्या त्यांनी आयोजित केला होता. त्या कार्यक्रमाशी नगरपरिषद प्रशासनाचा कोणताही संबंध नाही. नगर परिषदेच्या वतीने लवकरच अधिकृतरित्या सर्व नगरसेवकांना सोबत घेऊन उद्यानाचा लोकार्पण सोहळा आयोजित करण्यात येणार आहे, असेही नगराध्यक्षा शुभांगी बन्नेनवर यांनी सांगितले.
कोरोनामुळे सन २०२० मध्ये नगरपरिषदेचा निधी खर्च झाला नव्हता तो परत गेला होता. वीर शिवा काशीद उद्यानासह अन्य कामांना मुदतवाढ मिळावी यासाठी आपण स्वतः शासनाकडे मागणी केली होती. उद्यानाचा व अन्य कामाचा निधी शासनाकडे परत गेल्यानंतर आमदार विक्रम सावंत यांनी प्रशासकीय पातळीवर प्रयत्न करून तो परत आणला आहे. आमदार विक्रम सावंत यानी कामाला मुदतवाढ मिळवून दिल्यामुळे वीर शिवा काशीद उद्यानासह जत शहरातील अन्य कामे मार्गी लागत आहेत. शहराच्या विकासासाठी आमदार सावंत यांचे योगदान मोठे आहे. सर्वांना सोबत घेऊन काम करण्यावर आपला प्रथमपासून भर आहे. भविष्यातही सर्वाना सोबत घेऊन शहराचा कायापालट करण्याचा मानस आहे, असे त्यांनी सांगितले.