- अविनाश कोळी, सांगलीकुंडल : दिवंगत काँग्रेस नेते डॉ. पतंगराव कदम यांच्या कन्या भारती महेंद्र लाड (वय ५३) यांचे पुण्यात अल्पशा आजाराने सोमवारी (२८ एप्रिल) सकाळी निधन झाले. त्यांच्याच नावाने पतंगराव कदम यांनी शैक्षणिक व अन्य संस्थांचे जाळे देशभर विणले आहे.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
भारती लाड यांचा जन्म १८ जुलै १९७२ रोजी सोनसळ (ता. कडेगाव) येथे झाला. पतंगराव कदम यांच्या संघर्षाचा काळ त्यांनी अतिशय जवळून पाहिला होता. त्यामुळे डॉ. कदम यांनी त्यांच्याच नावाने सर्व संस्थांचे जाळे उभे केले.
अनेक संस्थांची उभारणी
राजकीय, सामाजिक वारसा जपत भारती लाड यांनी आयुष्यभर सामान्य राहणीमान जपले. कुंडल (ता. पलूस) येथील सामाजिक कार्यकर्ते आणि उद्योजक असलेले महेंद्र लाड यांच्याशी त्यांनी १९९३ मध्ये विवाह केला. त्यांच्या प्रयत्नातून भारती शुगर, डॉ. पतंगराव कदम विद्या संकुल, अशा अनेक संस्था नावारुपास आल्या.
वाचा >>आपल्याच लोकांनी विश्वासघात केला! पहलगाम हल्ल्यात १५ काश्मिरींची ओळख पटली
महिलांच्या समस्यांना वाचा फोडण्यासाठी आणि त्यांना हक्काचे व्यासपीठ उभे करून देण्यासाठीही त्यांनी प्रयत्न केले होते. महिलांच्या अडीअडचणी सोडवण्यात त्या नेहमी अग्रेसर होत्या.
महेंद्र लाड यांच्यावर जिल्हा बँकेचे संचालक तर रयत शिक्षण संस्थेचे उपाध्यक्ष पदाची जबाबदारी आल्याने गावगाडा आणि संसार यांची जबाबदारी त्यांनी पेलली. त्यांच्या पश्चात पती, दोन मुले असा परिवार आहे.
चक्कर आल्याने रुग्णालयात केले होते भरती
भारती लाड यांना १४ एप्रिल रोजी चक्कर आल्याने सांगली येथील भारती हॉस्पिटलमध्ये दाखल केले होते. डॉक्टरांनी त्यांना तातडीने पुण्याला नेण्याचा निर्णय घेतला.
पुण्यातील भारती हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. उपचार सुरु असताना त्यांचे सोमवारी सकाळी निधन झाले.
कुंडलमध्ये अंत्ययात्रा
कुंडलमध्ये अंत्ययात्रा काढून त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. गाव बंद ठेवून श्रद्धांजली वाहण्यात आली. मुले ऋषिकेश आणि रोहन यांनी भडाग्नी दिला.
यावेळी खासदार विशाल पाटील, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, आमदार डॉ. विश्वजीत कदम, आमदार सुहास बाबर, आ. अरुण लाड, माजी आमदार मानसिंग नाईक, पृथ्वीराज देशमुख, दिनकर पाटील, संग्रामसिंह देशमुख, मोहनराव कदम, डॉ. शिवाजीराव कदम, अमोल बाबर, जयसिंग कदम, शरद कदम, डॉ. जितेश कदम, जे. के. बापू, जाधव, विटा हायस्कूलचे मुख्याध्यापक हणमंत जाधव, बाळासाहेब पाटील, बाळासाहेब पवार, जिल्हा बँकेचे संचालक पृथ्वीराज पाटील आदी उपस्थित होते.
विश्वजीत कदम यांची भावूक पोस्ट
भारती यांच्या निधनानंतर विश्वजीत कदम यांनी सोशल मिडियावर भावूक पोस्ट करीत त्यांच्यासोबतच्या आठवणींना उजाळा दिला. ‘भारतीताई यांच्या निधनाने कदम कुटुंबीयांची मोठी हानी झाली असून ती कधीही न भरुन निघणारी आहे. आजवरच्या वाटचालीत त्यांचं पाठबळ, प्रेम, स्नेह नेहमीच उर्जादायी राहिले.’