पाली, बुद्धिस्ट स्टडी विभाग सुरु करावा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 21, 2021 04:19 AM2021-07-21T04:19:24+5:302021-07-21T04:19:24+5:30
सांगली : डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाप्रमाणेच शिवाजी विद्यापीठ व विद्यापीठ संलग्न महाविद्यालयांत पाली, प्राकृत भाषा तसेच बुद्धिस्ट स्टडी ...
सांगली : डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाप्रमाणेच शिवाजी विद्यापीठ व विद्यापीठ संलग्न महाविद्यालयांत पाली, प्राकृत भाषा तसेच बुद्धिस्ट स्टडी सेंटर व संबंधित अभ्यासक्रम तत्काळ सुरु करावेत, अशी मागणी रिपब्लिकन स्टुडंट युनियनच्यावतीने करण्यात आली आहे.
शिवाजी विद्यापीठास दिलेल्या निवेदनात संघटनेचे अमोल वेटम यांनी म्हटले आहे की, औरंगाबाद येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात जपान, चायना, थायलंड, सिंगापूर, मलेशिया यासह युरोपियन देश, अमेरिका, आशिया, आफ्रिका या खंडातून अनेक विद्यार्थी पाली, प्राकृत भाषा व बुद्धिस्ट स्टडी करण्यासाठी येत असतात. प्राचीन इतिहास असणारा बौद्ध धर्म, बौद्धकालीन लेण्या या संपूर्ण देशात तसेच भारताबाहेरही आढळतात. शांततेचा, मानवतेचा संदेश देणारे तथागत बुद्धांच्या विचारांची खरी गरज आज या देशाला आहे. सांगली, सातारा, कोल्हापूर या जिल्ह्यातही बौद्धकालीन लेण्या व त्याचा इतिहास पहावयास मिळतो. याचे जतन व याबाबत अधिक संशोधन होणे गरजेचे आहे, त्यामुळे त्यांचे अभ्यासक्रम शिवाजी विद्यापीठाअंतर्गत सुरु करावेत.
शिवाजी विद्यापीठाचे उपकेंद्र सांगली शहरातच व्हावे तसेच विद्यापीठाअंतर्गत भारतीय संविधान, ॲट्रॉसिटी कायद्याविषयक माहिती, जनजागृती, संशोधन याकामी कोर्सेस सुरु करावेत, अशीही मागणी त्यांनी केली आहे.