लोकमत न्यूज नेटवर्क
सांगली : नगरपालिकेच्या काळात शहरातील नागरिकांच्या आरोग्याची विशेष काळजी घेणारी यंत्रणा सक्षमपणे उभी राहिली. पण, महापालिका स्थापन झाल्यापासून पूर्वी उपलब्ध असलेल्या सोयीसुविधा पूर्णपणे कोलमडून पडल्या. त्यात आरोग्य विभागाकडील रिक्त पदांची यादी दिवसेंदिवस वाढतच गेली. मंजूर ३६७ पदांपैकी २०५ पदे रिक्त आहेत. ही यंत्रणा पूर्ण सक्षमतेने कार्यान्वित असती तर कोरोनाच्या लढाईला आणखी बळकटी आली असती. त्यामुळे आता आरोग्य विभागालाच उपचाराची गरज आहे.
तत्कालीन नगरपालिकेच्या काळात दवाखाने, डायग्नोस्टीक सेंटर, फिरता दवाखाना, प्रसूतीगृह आदींच्या माध्यमातून नागरिकांना आरोग्य सुविधा पुरविल्या जात होत्या. त्या काळी या दवाखान्यावर नागरिकांचा विश्वास होता. पण, आता परिस्थिती पालटली आहे. सर्वच सुविधा कोलमडल्या आहेत. त्यामुळे शहराच्या आरोग्याचा भार शासकीय व खासगी रुग्णालयांवर पडला आहे. त्यातच सध्या वैद्यकीय सेवा महाग झाल्याने सर्वसामान्य नागरिकांच्या आवाक्याबाहेर गेली आहे. सध्या महापालिकेचा आरोग्य विभाग केवळ मलमपट्टी करण्यापुरताच मर्यादित राहिला आहे. या विभागाकडील अनेक पदे कित्येक वर्षांपासून रिक्त आहेत. काही रिक्त पदांवर प्रभारी कर्मचाऱ्यांची नियुक्ती केली आहे. पण, त्यांच्याकडे इतरही कामाचा व्याप असल्याने आरोग्य विभागाकडे दुर्लक्षच होते. कोरोनाच्या काळात राष्ट्रीय आरोग्य अभियानातून उभारलेली आरोग्य केंद्रे, त्यांच्याकडील डाॅक्टर, नर्सेस व कर्मचाऱ्यांचा मोठा हातभार लागला. त्यांच्या मदतीला पालिकेची सक्षम आरोग्य यंत्रणा असती तर कोरोनाच्या काळात नागरिकांना आणखी दिलासा मिळाला असता.
चौकट
विभाग मंजूर पदे रिक्त पद
सार्वजनिक आरोग्य १६७ १०३
प्रसूतिगृह ५९ ३१
इतर दवाखाने ९१ ४६
कुटुंब कल्याण केंद्रे १२ ०४
नागरी आरोग्य ३४ १९
चौकट
परिचारिका, वैद्यकीय अधिकाऱ्यांची वानवा
महापालिकेच्या आरोग्य विभागाकडील अनेक महत्त्वाची पदे रिक्त आहेत. वैद्यकीय आरोग्याधिकारी, वैद्यकीय अधिकारी, नर्सेस, औषध निर्माता, लॅब अस्टिटंट, दाई, आया, वॉर्ड बाॅय, कम्पाउंडर, लस टोचक, अन्न निरीक्षक, वरिष्ठ स्वच्छता निरीक्षक, स्वच्छता निरीक्षक आदींचा रिक्त पदांमध्ये समावेश आहे.
चौकट
‘राष्ट्रीय आरोग्य’मुळे आधार
दहा वर्षांपूर्वी राष्ट्रीय नागरी आरोग्य अभियानातून दहा दवाखाने व एक रुग्णालय मंजूर झाले. त्यापैकी मल्टीस्पेशालिटी रुग्णालय वगळता इतर आरोग्य केंद्रे उभारली. कोरोनाच्या काळात हीच आरोग्य केंद्रे नागरिकांच्या मदतीला धावून आली. कोरोना रुग्णांचा शोध, उपचार आणि आता लसीकरणाचे काम आरोग्य केंद्रांतून सुरू आहे. महापालिकेकडील आरोग्य सेवेचे बळकटीकरण झाले असते तर आणखी चांगल्या व पुरेशा सुविधा नागरिकांना देता आल्या असता. त्यात रुग्णालयाचेही काम रखडले आहे. तेही पूर्ण झाले असते तर शहरातील रुग्णांसाठी मोफत उपचार मिळू शकले असते.