सांगली : आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणातर्फे १०४ पूरप्रवण गावांत ऑनलाईन प्रशिक्षण दिले जाणार आहे. मिरज, पलूस, वाळवा व शिराळा तालुक्यांतील गावांतील आपत्ती व्यवस्थापन प्रतिसाद दलांना गुरुवारी व शुक्रवारी (दि. २४ व २५) प्रशिक्षण दिले जाईल.
कोल्हापुरातील व्हाईट आर्मी व सांगलीतील रॉयल बोट क्लबचे सदस्य प्रशिक्षण देणार आहेत. गावांनी सहभाग घेण्याचे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. अभिजित चौधरी यांनी केले आहे.
बोट, इंजिन, लाईफ जॅकेट, लाईफ रिंग आदी आपत्कालीन साहित्याची माहिती, प्रथमोपचार, शोध व सुटकेची कार्यपध्दती आदींबाबत प्रशिक्षण दिले जाईल. गुरुवारी सकाळी ११ ते १२.३० या वेळेत मिरज तालुक्यातील २० गावांचे प्रशिक्षण होईल. दुपारी ३ ते ४.३० या वेळेत पलूस तालुक्यातील २५ गावांना मिळेल.
शुक्रवारी सकाळी ११ ते १२.३० या वेळेत वाळवा तालुक्यातील ३८ गावांना, तर दुपारी ३ ते ४.३० या वेळेत शिराळा तालुक्यातील २१ गावांना प्रशिक्षण दिले जाणार आहे.
चौकट
प्रशिक्षणासाठीची लिंक अशी...
प्रशिक्षणाची लिंक https://mh.dit.webex.com/meet/collector.sangli अशी आहे. तलाठी, ग्रामसेवक, पोलीस पाटील, सरपंच आदी गावस्तरावरील अधिकारी व पदाधिकाऱ्यांनीही प्रशिक्षण घ्यायचे आहे.