लोकमत न्यूज नेटवर्क
शिराळा : बिऊर (ता. शिराळा) येथे २०१९ च्या जबरी चोरी गुन्ह्यातील आरोपी रामचंद्र आनंदा वडार (रा. शिराळा, ता. शिराळा) यास एक वर्षाचा सश्रम कारावास आणि दंडाची शिक्षा ठोठविण्यात आली. प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी बी. एम. काळे यांनी शिक्षा सुनावली.
बिऊर येथे २०१९ साली ही घटना घडली होती. यातील आरोपीने यातील साक्षीदार महिलेला ती घरी असताना घरात घुसून मारहाण करून गंभीर जखमी केले व तिच्या गळ्यातील बोरमाळ व तिच्या आईच्या गळ्यातील सोन्याची कर्णफुले चोरून पळून गेला होता. शिराळा पोलिसांनी आरोपीला जेरबंद केले. आरोपींविरुद्ध शिराळा पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा नोंद करण्यात आला होता. पोलिसांनी तपास करून आरोपींविरुद्ध दोषारोपपत्र दाखल केले होते.
सरकार पक्षातर्फे सरकारी वकील ॲड. ज्योती संदीप पाटील यांनी साक्षीदारांची साक्ष नोंदवून युक्तिवाद केला होता. हवालदार भीमराव यादव यांनी सहकार्य केले. तपास अधिकारी सहायक पोलीस निरीक्षक विशाल पाटील यांनी केला आहे.