सांगली : येत्या गळीत हंगामासाठी जिल्ह्यात एक लाख २२ हजार ८६९ हेक्टर उसाची उपलब्धता आहे. यापैकी जिल्ह्यातील कारखान्यांकडे एक लाख तीन हजार ९८० हेक्टर उसाची नोंद आहे. कोल्हापूर, सातारा जिल्ह्यातील आठ कारखान्यांनी सांगली जिल्ह्यात १९ हजार हेक्टर उसाची नोंद केली आहे. कर्नाटक सीमा भागातील कारखानेही ऊस नेणार असल्यामुळे जिल्ह्यातील कारखान्यांनी जादा उसाचा बागुलबुवा करण्याची गरज नाही.
जिल्ह्यातील ताकारी, टेंभू, म्हैसाळ उपसा सिंचन योजनेमुळे उसाचे क्षेत्र वाढले आहे. जिल्ह्यात सरासरी ७५ हजार हेक्टर उसाचे क्षेत्र असताना एक लाख २२ हजार ८६९ हेक्टरवर उसाची लागवड झाली आहे. उसाचे क्षेत्र वाढले असले तरी साखर कारखान्यांनी गाळप क्षमता दुप्पटीने वाढविल्या आहेत. अन्य जिल्ह्यातील कारखानेही ऊस नेणार आहेत. यामुळे वाढलेल्या क्षेत्रातील सर्व ऊस कारखान्यांना गरजेचाच आहे. दुष्काळी भागामध्ये पाण्याची उपलब्धता लक्षात घेतल्यास तेथील उसाचे क्षेत्र वाढणे चिंतेचीच बाब आहे. ऊस पीक हे जादा पाणी लागणारे पीक असल्यामुळे शेतकऱ्यांनी उसाचे क्षेत्र वाढविताना विचार करण्याची गरज आहे. जिल्ह्यात एकूण १८ कारखाने असून, त्यापैकी १५ कारखानेच गळीत हंगाम घेतील, अशी परिस्थिती आहे. १५ कारखान्यांनीच उसाची नोंदणी केली आहे. जिल्ह्यातील १५ कारखान्यांशिवाय कोल्हापूर जिल्ह्यातील वारणा, शरद, रेणुका शुगर्स (पंचगंगा), गुरुदत्त, अथणी युनिट शाहुवाडी कऱ्हाड तालुक्यातील सह्याद्री, यशवंत, जयवंत या कारखान्यांनी सांगली जिल्ह्यातील १८ हजार ८८८ हेक्टर उसाची नोंद केली आहे. याशिवाय, कर्नाटक राज्यातील कारखानेही मोठ्या प्रमाणातून जिल्ह्यातून ऊस वाहतूक करण्याची शक्यता आहे. यामुळे जरी एक लाख २२ हजार ८६९ हेक्टर ऊस दिसत असला तरी सांगली जिल्ह्यातील कारखान्यांच्या वाट्याला एक लाख हेक्टरपेक्षाही ऊस येणार आहे. यामध्ये नोंदणी करूनही कारखान्यांनी वेळेत ऊस नेला नाही तर अन्य कारखान्यांना ऊस घालणारे शेतकरी आहेत. यामुळे जादा उसाचा बागुलबुवा करून कारखान्यांनी ऊस दर पाडण्याची स्वप्ने पाहू नयेत, असा सल्ला संघटनाच्या नेत्यांनी दिला आहे.
चौकट
जिल्ह्यातील कारखान्यांकडे उसाची नोंदणी
कारखाना ऊस क्षेत्र (हेक्टर)
राजारामबापू साखराळे १०००६.०६
राजारामबापू वाटेगाव ४७४४.८२
राजारामबापू कारंदवाडी ५०२४.१९
राजारामबापू तिप्पेहळ्ळी, ता. जत ४६६१.५१
हुतात्मा-वाळवा ८३१७.८५
विश्वासराव नाईक ५८७५.०७
सोनहिरा १२७३४.८९
क्रांती-कुंडल ८२६५.०२
उदगिरी शुगर्स ६२१९
श्री श्री सद्गुरु राजेवाडी ११२७.५४
दत्त इंडिया १२४७०
मोहनराव शिंदे ५८२२.८८
दालमिया शुगर ४२९०
एसजीझेड शुगर्स, तुरची (तासगाव) २४३०.३६
एसजीझेड शुगर्स, नागेवाडी १८६३.५३
एकूण १०३९८०.२३