रेल्वेस्थानक रस्त्यावर फिरणाऱ्या अमली पदार्थाच्या व्यसनी गुन्हेगारांकडून प्रवाशांना मारहाण करून त्यांच्या खिशातील पैसे व वस्तू काढून घेण्यात येतात. बुधवारी रात्री येथे झोपलेल्या एका अज्ञात प्रवाशास काही जणांनी मारहाण करून त्याचा मोबाइल काढून घेतला. मारहाण झालेल्या प्रवाशाचा गुरुवारी सकाळी मृतदेह तेथेच रस्त्यावर पडल्याचे आढळाले.
याबाबत स्थानिक नागरिकांनी माहिती दिल्यानंतर पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी पाठविला. रेल्वेस्थानक रस्त्याचे काम सुरू असल्यामुळे दोन्ही बाजूला पत्रे मारून रस्ता बंद करण्यात आला आहे. याचा फायदा घेऊन येथे लुटमारीचे प्रकार सुरू आहेत. बुधवारी रात्री या घटनेबाबत नागरिकांनी संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केली. पोलिसांनी मात्र शवविच्छेदन अहवाल आल्यानंतरच याबाबत पुढील कारवाई करणार असल्याचे सांगितले.