सांगली : नुकत्याच झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकीत विरोधी उमेदवाराबद्दल बोलल्याच्या रागातून कर्नाळ येथे एकास मारहाण करण्यात आली. याप्रकरणी राजू तुकाराम पाटील (रा. ग्रामपंचायत मागे, कर्नाळ) यांनी बसाप्पा शाबु रानगट्टे, विजय बाळकृष्ण पाटील, वल्लभ विष्णू पाटील, विनोद बाळकृष्ण पाटील, विलास बाळकृष्ण पाटील, विकास शिवाजी पाटील (सर्व रा. कर्नाळ) यांच्याविरोधात ग्रामीण पोलिसांत फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, एसटी महामंडळात नोकरीस असलेले फिर्यादी पाटील हे सोमवारी दुपारी साडेचारच्या सुमारास गावात खोत यांच्या घरासमाेरून चालले होते. यावेळी पराभूत पॅनेलच्या उमेदवाराविरूध्द बोलला असा गैरसमज करून पाटील यांना रस्त्यात अडवून मारहाण करण्यात आली. यावेळी संशयिताने त्यांच्या डोळ्याजवळ मारल्याने त्यांचा चष्मा फुटून नाकावरही जखम झाल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. त्यानुसार पोलिसांनी संशयितांवर गुन्हा दाखल केला आहे.