सांगली : आष्टा येथील रुग्णाला कोरोनाच्या डेल्टा प्लस व्हेरिएंटची बाधा झाल्याचे स्पष्ट होताच आरोग्य यंत्रणेने तातडीने मोहीम राबविली. त्याच्या संपर्कातील व परिसरातील ५४ जणांच्या चाचण्या केल्या. त्यापैकी एकजण कोरोनाबाधित आढळला आहे.
आष्ट्यातील एका कोरोना बाधिताच्या घशातील स्रावाचे नमुने तपासणीसाठी राष्ट्रीय विषाणूशास्त्र संस्थेकडे (एनआयव्ही) पाठविले होते, त्यामध्ये कोरोनाची पुढील आवृत्ती म्हणजे डेल्टा प्लस विषाणू सापडले होते. जिल्ह्यातील हा पहिलाच डेल्टा प्लस संक्रमित रुग्ण असल्याने आरोग्य यंत्रणा सतर्क झाली. सध्या या बाधिताची प्रकृती खडखडीत असली तरी पुन्हा नमुने घेतले. त्याच्या कुटुंबीयांसह परिसरातील व संपर्कातील ५४ जणांचे घशातील स्रावाचे नमुने घेतले. मिरज कोविड प्रयोगशाळेत तपासणी केली, तेव्हा ५३ नमुने निगेटिव्ह आढळले. एकजण कोरोनाबाधित निष्पन्न झाला. त्याच्या घशातील स्रावाचे नमुने पुण्याला एनआयव्हीकडे तपासणीसाठी पाठविले आहेत. त्याला संसर्ग झालेला कोरोना विषाणू डेल्टा प्लस व्हेरिएंट नाही ना, याची खातरजमा केली जाणार आहे. त्याचा अहवाल अद्याप आला नसल्याचे जिल्हा आरोग्याधिकारी डॉ. मिलिंद पोरे यांनी सांगितले.
दरम्यान, डेल्टा प्लसवर आरोग्य यंत्रणा बारकाईने नजर ठेवून आहे. मिरज कोविड प्रयोगशाळेत प्रत्येक आठवड्याला सरासरी २० हजार नमुन्यांची तपासणी केली जाते. त्यातील जिल्ह्याच्या वेगवेगळ्या भागातील २५ नमुने प्रत्येक आठवड्याला बाजूला केले जातात. म्हणजे महिन्याला ८० हजारपैकी १०० नमुन्यांची तपासणी डेल्टा प्लसच्या अनुषंगाने केली जाते. पुण्यात एनआयव्ही आणि आणखी एक शासनमान्य खासगी प्रयोगशाळा ही तपासणी करते. राज्यात दोनच ठिकाणी तपासणी होत असल्याने चाचणीचा अहवाल येण्यास एक ते दीड महिना वेळ लागतो.