सांगली : दिग्गज राजकीय नेत्यांनी जिल्हा बँकेच्या संचालक मंडळात येण्यासाठी जोरदार फिल्डिंग लावली आहे. इच्छुकांची वाढलेली संख्या, जागा वाटपावरुन सुरु असलेला खल यामुळे मागील पंचवार्षिक निवडणुकीप्रमाणे यावेळीही निवडणूक बिनविरोध होण्याची शक्यता कमी दिसत आहे.
जिल्हा बँकेच्या संचालक मंडळाला नेहमीच हेवीवेट मंडळ समजले जाते. खासदार, आमदारांसह, आजी-माजी आमदार, पक्षांचे पदाधिकारी यांचा या संचालक मंडळात नेहमीच समावेश असतो. जुन्या पिढीतली नेतेमंडळी इच्छुक असतानाच अनेक नेत्यांची मुले, युवा नेतेही जिल्हा बँकेत येण्यासाठी सरसावली आहेत. मागील पंचवार्षिक निवडणुकीत काँग्रेसने मागितलेल्या जागा देण्यास राष्ट्रवादीने नकार दिल्यानंतर पॅनल टू पॅनल निवडणूक लागली होती. यावेळी राज्यात काँग्रेस, राष्ट्रवादी व शिवसेनेची एकत्रित महाविकास आघाडी असल्याने जिल्हा बँकेची निवडणूक बिनविरोध करण्याचा प्रयत्न केला जात आहे.
जागा २१ असताना इच्छुकांची संख्या जवळपास अडीचपट आहे. त्यामुळे बॅंकेची निवडणूक बिनविरोध करण्यात मोठी अडचण येणार असून, जास्तीत जास्त चार चे पाच जागा बिनविरोध होण्याची शक्यता आहे. उर्वरित १५ ते १६ जागांवर निवडणूक लागण्याचा अंदाज आहे.
जलसंपदा मंत्री जयंत पाटील व कृषी राज्यमंत्री विश्वजित कदम, काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष विशाल पाटील यांची भूमिका यात सर्वात महत्त्वपूर्ण ठरणार आहे. भाजपच्यावतीनेही काही जागांची मागणी होणार असली तरी सर्वात मोठी अडचण राष्ट्रवादी व काँग्रेसमधील इच्छुकांची आहे. त्यामुळे या दोन पक्षांच्या जागांच्या वाटपात अडचणी निर्माण होण्याची शक्यता आहे.
चौकट
दोन हजारांवर सभासद
जिल्हा बॅँकेच्या प्रारूप मतदार यादीत पात्र सभासद २,५७३ आहेत. यात २,२१९ संस्था सभासद आहेत तर ३५२ व्यक्तिगत व एक कंपनी सभासद आहे. २,२१९ संस्था सभासदांमध्ये ७६५ विकास सोसायट्यांचे सभासद आहेत. दूध, पशू पैदास, वराह पालन, कुक्कुटपालन, शेळी-मेंढी पालन, पाणी पुरवठा व शेंग उत्पादक आदी इतर शेती संस्था गटात ३३३, खरेदी-विक्री संघ, साखर कारखाने, ऑईल मिल, सूत गिरण्या आदी कृषी, पणन संस्था व शेतीमाल प्रक्रिया संस्था गटात ७१, नागरी सहकारी बॅँका, पतसंस्था, ग्रामीण बिगरशेती पतसंस्था, पगारदार नोकरांच्या संस्था गटात ६४९ तर ग्राहक, गृहनिर्माण, औद्योगिक प्रक्रिया - उत्पादन, मजूर संस्था, सर्वसाधारण संस्था या गटात ४०१ सभासद आहेत.