लोकमत न्यूज नेटवर्क
सांगली : कोरोनाचे संकट वाढत असताना, आरोग्य सेवेस झोकून देणाऱ्या कर्मचाऱ्यांमुळेच दिलासा मिळत आहे. आपली वैयक्तिक सुख-दु:खे बाजूला सारून रुग्णांच्या वेदनेवर फुंकर घालण्यासाठी अहोरात्र झटणाऱ्या परिचारिका या आरोग्यसेवेचा मजबूत कणा आहेत, असे प्रतिपादन जिल्हाधिकारी डॉ. अभिजित चौधरी यांनी केले.
जागतिक परिचारिका दिनानिमित्त जिल्हाधिकारी डॉ. चौधरी यांनी परिचारिकांना शुभेच्छा दिल्या.
जिल्हाधिकारी म्हणाले की, आरोग्य व्यवस्थेत कितीही आव्हाने निर्माण झाली तरीही परिचारिका आपले कर्तव्य निभावत असतात. करुणामय अंतकरणाने नर्सेस आजारपणात रुग्णांची काळजी घेतात. रुग्णाची सेवाभावाने शुश्रूसा करीत असतानाच त्यांना हळूवाळरपणे धीरही देत असतात. एक वर्षाहून अधिक काळ संपूर्ण जग कोरोना महामारीशी लढत असताना नर्सेसनी जिवाची बाजी लावून केलेली रुग्णसेवा व रुग्णसेवा करीत असताना अनेक परिचारिका स्वत: आजारी पडल्या. अनेकांनी आपल्या जवळची माणसे गमावली; पण या साऱ्यांवर मात करीत पुन्हा त्या या लढाईत कोरोनाला हरविण्यासाठी सज्ज झाल्या आहेत. हेच त्यांचे कर्तव्य सर्वांसाठी प्रेरणादायी असल्याचेही जिल्हाधिकारी डॉ. चौधरी म्हणाले.