सांगली : भांडवली मूल्यावरील घरपट्टीचा शॉक लागतो न लागतो तोच आता खासगीकरणामुळे पाणीपट्टी वाढीचा झटका नागरिकांना बसण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे. महापालिका ठेकेदाराला दरवर्षी १ कोटी २६ लाख रुपये देणार असून, पाणीपुरवठा विभागाचे उत्पन्न वाढले तर त्यापोटी कमिशनही ठेकेदाराला दिले जाणार आहे. त्यामुळे नागरिकांच्या डोक्यावर कराचा बोजा वाढणार आहे. महापालिका क्षेत्रातील पाणीपुरवठ्याच्या खासगीकरणाचा प्रस्ताव गत स्थायी समिती सभेत विषयपत्रिकेवर घेण्यात आला होता. या प्रस्तावाला घाईगडबडीत मंजुरी देण्यात आली. पुण्यातील मे. क्रेन्टबेरी एन एक्स सर्व्हिसेस प्रा. लि. या कंपनीला हा ठेका देण्याबाबत प्रशासन सकारात्मक असल्याचे प्रशासकीय टिपणीत म्हटले आहे. पाणीपुरवठा विभागाच्या बहुतांश कामांचा समावेश केला आहे. ही सर्व कामे ठेकेदाराला सोपविण्याचे सुचविण्यात आले आहे. यामध्ये महापालिका हद्दीतील सर्व कनेक्शन्सचे रिडिंग घेणे, छायाचित्र बिल स्वरूपाची पाणीपट्टी बिले तयार करणे, बिलांचे वाटप करणे, अनधिकृत कनेक्शन्सचा सर्व्हे करणे, सर्व कनेक्शन्सना चालू स्थितीतील मीटर बसविणे, तक्रारींचे निराकरण करणे, कनेक्शन्स व वसुलीबाबतचा अहवाल तयार करणे, थकबाकी वाढलेल्या ग्राहकांच्या बिलांबाबत ठोस निर्णय घेऊन वसुली करणे आदी कामांचा समावेश आहे. महापालिका क्षेत्रात सध्या ६७ हजार २०० घरगुती, तर २ हजार ५०० बिगर घरगुती कनेक्शन्स् आहेत. महापालिकेच्या संपूर्ण पाणीपुरवठा यंत्रणेचे २००९-१० या वर्षी नागपूर येथील मा. दिनेश राठी अॅण्ड असोसिएटस् या खासगी सल्लागारांमार्फत वॉटर आॅडिट करण्यात आले होते. अपुऱ्या कर्मचारी वर्गामुळे अनेक त्रुटी या विभागात असल्याचे मत सल्लागार कंपनीने व्यक्त केले होते. महापालिकेला वर्षाकाठी सरासरी १४ ते १५ कोटी मिळत आहेत. मागणीच्या तुलनेत रक्कम कमी असल्याने खासगीकरणाचा घाट घातला जात आहे. (प्रतिनिधी)
घरपट्टीनंतर आता पाणीपट्टीचा झटका
By admin | Updated: August 18, 2015 00:37 IST