लोकमत न्यूज नेटवर्क
सांगली : दहावी आणि बारावीच्या परीक्षा रद्द करून मूल्यांकनाच्या आधारे निकाल लावला गेला, पण यामध्ये गुणवंत विद्यार्थ्यांना अपेक्षेनुसार गुण मिळाले नसल्याने त्यांचा विरस झाला आहे. याउलट ३५ टक्क्यांची अपेक्षा असणारा फर्स्ट क्लासमध्ये, तर उत्तीर्ण होण्याची खात्री नसणाराही डिस्टींक्शनमध्ये गेला आहे. ९० टक्क्यांहून अधिक गुणांची खात्री असणाऱ्यांचा मात्र विरस झाला आहे.
बॉक्स
पुनर्मूल्यांकन नाही, थेट पुनर्परीक्षाच
- दहावी व बारावीचा निकाल जाहीर झाल्यावर विद्यार्थ्यांना पुनर्मूल्यांकनाची संधी मिळालेली नाही.
- त्याऐवजी आता पुनर्परीक्षाच द्यावी लागणार असून त्याचे वेळापत्रक परीक्षा मंडळाने शुक्रवारी (दि.२०) जाहीर केले आहे.
- सप्टेंबर, ऑक्टोबरची पुनर्परीक्षा होणार की नाही याबाबत संदिग्धता असतानाच परीक्षा मंडळाने फॉर्म भरण्याचे वेळापत्रक जाहीर केले आहे.
बॉक्स
गुणांचा फुगवटावाले पुढे टिकणार का?
- कसेबसे उत्तीर्ण होण्याची अपेक्षा असणाऱ्या विद्यार्थ्यांना ६० ते ८० टक्के गुण मिळाले आहेत.
- असे विद्यार्थी कठीण अभियांत्रिकी किंवा शास्त्र शाखेत टिकणार का? असा प्रश्न शिक्षकांनी उपस्थित केला आहे.
- नववीपर्यंत समान गुणवत्तेच्या वर्गमित्रांमध्ये एकाला ६०, तर दुसऱ्याला ९५ टक्के गुण मिळाल्यानेही विद्यार्थ्यांत अस्वस्थता आहे.
कोट
वाढलेल्या मेरिटमध्ये आमची मुले मागे पडतील
दणक्यात लागलेल्या निकालामुळे पुढील शिक्षणक्रमांच्या प्रवेशाचे मेरिट आवाक्याबाहेर वाढणार आहे. अर्धा-एक टक्क्यांच्या फरकात मुलांचे प्रवेश हुकण्याची भीती आहे. खरोखरच गुणवंत असणाऱ्या विद्यार्थ्यांच्या पंगतीत आता कमी क्षमतेचे विद्यार्थीही येऊन बसले आहेत.
- राजीव जोशी, पालक, सांगली.
बारावीला अपेक्षेप्रमाणे गुण मिळाले नाहीत, पण अभियांत्रिकी किंवा वैद्यकीय शाखेसाठी केंद्रीय प्रवेश परीक्षा होणार असल्याने निश्चिंत आहे. पात्र विद्यार्थीच या परीक्षेत उत्तीर्ण होतील. त्यामुळे बारावीला मूल्यांकनामुळे लॉटरी लागलेले विद्यार्थी आपोआप मागे पडतील.
- गजानन हल्लोळे, पालक, सांगली
कोट
टक्का वाढला, पण खरी परीक्षा पुढेच
दहावीच्या परीक्षेत ८० टक्क्यांपर्यंत गुणांचा अंदाज होता, पण ९२ टक्के मिळाले. इतके चांगले गुण मिळाले तरी अकरावीलाच प्रवेश घेणार आहे. बारावीनंतर अभियांत्रिकी किंवा अन्य पर्यायांचा विचार करेन. माझ्या वर्गमित्रांनाही चांगले गुण मिळालेत.
- सेजल वारे, विद्यार्थिनी, सुभाषनगर, मिरज.
महाविद्यालय बंद असले तरी अभ्यास मात्र सुरूच ठेवला होता, त्यामुळे ९० टक्क्यांवर गुणांची अपेक्षा होती. मूल्यांकनामुळे ८२ टक्क्यांवर घसरलो. परीक्षा झाली असती तर बरे झाले असते असे आता वाटू लागले आहे.
- प्रज्वल माने, विद्यार्थी, सांगली.
पॉईंटर्स
एकूण विद्यार्थी संख्या
दहावी - ३९,६३१,बारावी ३२,१११
पास झालेले विद्यार्थी
दहावी ३९,६११, बारावी ३१,९८७