सांगली : महापालिकेच्या मालकीचे भूखंड शोधून त्यावर महापालिकेचे नाव तातडीने लावून घ्यावे. यात कसलीही हयगय सहन केली जाणार नाही, असा इशारा महापौर दिग्विजय सूर्यवंशी यांनी शुक्रवारी दिला. महापौर दिग्विजय सूर्यवंशी यांच्या अध्यक्षतेखाली महापालिका क्षेत्रातील खुल्या भूखंडासंदर्भात बैठक झाली. बैठकीस प्रभारी सहा. संचालक नगररचना श्रीमती मुल्ला, नगररचनाकार शिवप्रसाद धूपकर, मालमत्ता व्यवस्थापक नितीन शिंदे, नगररचना विभाग व मालमत्ता विभागाकडील अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
महापौर सूर्यवंशी यांनी नगररचना विभागाकडून कागदोपत्री माहिती घेऊन महापालिकेच्या मालकीच्या मिळकतीच्या बाबतीत यापुढे कोणताही निष्काळजीपणा सहन केला जाणार नाही. नगररचना विभागाने मिळकतीस महानगरपालिकेचे नाव लावणे, मालमत्ता विभागाशी समन्वय साधून सर्व मालमत्ता ह्या महापालिकेच्या मालकी सदरी राहतील, याबाबत जबाबदारीने काम करावे, अशा सूचना दिल्या.
विरोधी पक्षनेते उत्तम साखळकर यांनी, गुंठेवारी क्षेत्रात जास्त गोंधळ असून, याकडे जाणीवपूर्वक लक्ष केंद्रित करावे. महापालिकेचे नाव लावल्याशिवाय गुंठेवारी प्रस्ताव मंजूर करू नये असे सांगितले. उपमहापौर उमेश पाटील यांनी पूर्वीच्या मिळकतीबाबत आढावा घ्यावा. पुढील बैठकीपर्यंत या सर्व बाबी पूर्ण न झाल्यास संबंधितावर कारवाई करावी लागेल, अशा सूचना दिल्या.