कवठेमहांकाळ : ना गुलाल, ना फटाके, ना जल्लोष... सुमनताई पाटील यांच्या विजयानंतर कार्यकर्त्यांनी वाहिली आबांना श्रद्धांजली... असे चित्र कवठेमहांकाळ तालुक्यात बुधवारी दिसले. विजयानंतर तालुक्यात केवळ आबांच्या अभिवादनाची होर्डिंग्ज झळकली.१६ फेब्रुवारीला तासगाव-कवठेमहांकाळ मतदारसंघाचे लोकप्रतिनिधी व माजी गृहमंत्री आर. आर. (आबा) पाटील यांचे अकाली निधन झाले आणि संपूर्ण मतदारसंघासह राज्यावर दु:खाचा डोंगर कोसळला. आबांचे कुटुंबीय आणि कार्यकर्ते दु:खातून बाहेर पडले नव्हते, इतक्यात मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाला. आबांचे कार्य लक्षात घेऊन भाजप, शिवसेना, काँग्रेस, आरपीआय, शेतकरी संघटना या प्रमुख पक्षांनी आपला उमेदवार रिंगणात उतरवला नाही. मात्र काही अपक्ष उभे ठाकल्याने निवडणूक लागली. ११ एप्रिल रोजी मतदान प्रक्रिया पार पडली. सुमनताई पाटील यांच्यासह नऊ उमेदवार रिंगणात होते. माजी राज्यमंत्री अजितराव घोरपडे यांच्या कार्यकर्त्यांनी स्वप्नील पाटील या अपक्ष उमेदवाराचे काम केल्याने कवठेमहांकाळ तालुक्यात स्वप्नील पाटील किती मते घेणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. बुधवारी निकाल जाहीर झाला आणि सुमनताई यांनी १ लाख १२ हजार ९५६ इतक्या विक्रमी मतांनी ऐतिहासिक विजय प्राप्त केला. मात्र आबांच्या निधनाच्या धक्क्यातून अद्याप न सावरलेल्या कार्यकर्त्यांनी या विजयानंतर ना गुलाल उधळला, ना फटाके उडवले, ना रस्त्यावर उतरून जल्लोष केला. कवठेमहांकाळ तालुक्यात ठिकठिकाणी आबांची होर्डिंग्ज लावून कार्यकर्त्यांनी अभिवादन केले. (वार्ताहर)
ना गुलाल, ना फटाके!
By admin | Updated: April 16, 2015 00:05 IST