लोकमत न्यूज नेटवर्क
इस्लामपूर : येत्या दोन वर्षांत वाळवा तालुक्यातील कोणीही बेघर राहणार नाही अशा पद्धतीने घरकुल उभारणीचे काम करू, असा विश्वास पालकमंत्री जयंत पाटील यांनी व्यक्त केला. शेतकरी सल्लागार मंडळाने तालुक्यातील प्रयोगशील शेतकऱ्यांना एकत्र करून सेंद्रिय शेतीस प्रोत्साहन द्यावे, असे आवाहनही त्यांनी केले.
वाळवा पंचायत समितीच्या वतीने वेळेत घरकुल बांधकाम पूर्ण केलेले लाभार्थी, यामध्ये योगदान दिलेल्या ग्रामपंचायती, तसेच जिल्हा परिषद मतदार गटांतील पदाधिकारी, अधिकाऱ्यांचा पाटील यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी सभापती शुभांगी पाटील, उपसभापती नेताजीराव पाटील, प्रांताधिकारी डॉ. संपत खिलारी, तहसीलदार रवींद्र सबनीस, गटविकास अधिकारी शशिकांत शिंदे, जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष देवराज पाटील, युवक राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष विराज नाईक उपस्थित होते.
पाटील म्हणाले, वाळवा पंचायत समिती ही राज्यात अग्रेसर असून, तालुक्यातील सामान्य माणसाला न्याय देण्याचे काम समितीने केले आहे. तालुक्यातील अपूर्ण घरकुलांचा आढावा घेऊन ती पूर्ण करण्यास पदाधिकाऱ्यांनी वेळ द्यावा. ‘ड’ यादीस मंजुरी देण्याचा माझा प्रयत्न आहे. सल्लागार समितीच्या सदस्यांनी जबाबदारी चोख पार पाडावी.
तालुका कृषी अधिकारी भगवान माने यांनी त्यांच्या विभागाची माहिती दिली. विनोद बाबर (साखराळे) यांच्या अध्यक्षतेखालील शेतकरी सल्लागार समितीच्या २२ सदस्यांना निवडपत्रे देण्यात आली.
शशिकांत शिंदे यांनी प्रास्ताविक केले. यावेळी राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष विजयराव पाटील, बाळासाहेब पाटील, सुस्मिता जाधव, छाया पाटील, संजय गांधी निराधार समितीचे अध्यक्ष संजय पाटील, जि. प. सदस्या राजश्री एटम उपस्थित होते. पं. स. सदस्या रूपाली सपाटे यांनी आभार मानले.