कामेरी : कामेरी (ता. वाळवा) येथील निलोफर सूरज मुल्ला यांना सकाळी फिरायला जाताना दोन तोळे वजनाचे सापडलेले गंठण प्रामाणिकपणे परत करून अजूनही समाजात नि:स्वार्थीपणे जीवन जगणारे लोक आहेत हे दाखवून दिले. त्यांचा या प्रामाणिकपणाचे सर्वत्र कौतुक होत आहे. मंगळवारी (दि. ९) पहाटे अंजली हवालदार व सुधीर हवालदार मॉर्निंग वॉकसाठी राष्ट्रीय महामार्गालगत सेवा रस्त्यावरून विठ्ठलवाडीच्या दिशेने जात असताना अंजली हवालदार यांच्या गळ्यातील दोन तोळे वजनाचे अंदाजे एक लाख रुपये किमतीचे गंठण तुटून पडले. काही अंतर पुढे गेल्यावर आपल्या गळ्यातील गंठण पडल्याचे त्यांचा लक्षात आले. त्यांनी परिसरात शोधण्याचा प्रयत्न केला.
त्याच वेळी निलोफर मुल्ला याही तेथून फिरायला जात असताना त्यांना अंजली रडत असल्याचे व त्या काहीतरी शोधत असल्याचे त्यांनी पाहिले होते. विचारपूस केली असता गळ्यातील गंठण पडल्याचे त्यांनी सांगितले होते. काही अंतर पुढे गेल्यावर निलोफर यांना ते गंठण सापडले त्यांनी घरी गेल्यावर आपल्या भावाकडून फोन करून गंठण सापडल्याचे त्यांना सांगितले व अंजली यांना ते परत केले. निलोफर यांच्या प्रामाणिकपणाबद्दल त्यांना अंजली हवालदार यांनी पाच हजार रुपये बक्षीस देऊन उद्योजक मोहन जाधव, शहाजी पाटील यांच्या हस्ते सत्कार केला. यावेळी जगदीश जाधव, सुरेश कापसे, ऐनुद्दीन तांबोळी, सुधीर हवालदार उपस्थित होते.
फोटो - ०९०२२०२१-आयएसएलएम-निलोफर मुल्ला