इस्लामपूर : वाळवा तालुका राष्ट्रवादीचे अध्यक्ष विजय पाटील यांनी निवडणुकीच्या अगोदर सहकार पॅनलची पाठराखण केल्याचा आरोप राष्ट्रवादीतूनच करण्यात आला. परिणामी आता सुरू असलेल्या निवडणुकीच्या प्रचारात थेट सहभाग नको, असा अलिखित आदेश काढण्यात आल्याचे खात्रीशीर वृत्त आहे.
नेर्ले-तांबवे गटात राष्ट्रवादीचे लिंबाजी पाटील आणि संभाजी पाटील यांची नावे सहकार पॅनलमधून निश्चित आहे. याच गटात रयत आणि संस्थापक पॅनलमधूनही राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनाच उमेदवारी मिळणार आहे. या गटात राजारामबापू बँकेचे उपाध्यक्ष ज्येष्ठ नेते जनार्दन पाटील, जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष देवराज पाटील, संजय गांधी निराधार योजनेचे तालुकाध्यक्ष संजय पाटील यांच्यासह राजारामबापू उद्योगसमूहातील बहुतांशी पदाधिकारी आहेत. त्यांनी थेट प्रचारात सहभागी होऊ नये, असा अलिखित आदेश पक्षाकडून काढण्यात आला आहे.
बोरगाव-रेठरे हरणाक्ष गटातही राष्ट्रवादीची अशीच अवस्था आहे. सहकार पॅनलमधून संजय पाटील, जे. डी. मोरे, जयश्री पाटील, अविनाश खरात यांची नावे निश्चित आहेत. याही गटात रयत आणि संस्थापक पॅनलमधून जयंत पाटील यांचे नेतृत्व मानणाऱ्या इच्छुक कार्यकर्त्यांचा भरणा आहे. महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेचे माजी अध्यक्ष माणिकराव पाटील, राजारामबापू दूध संघाचे अध्यक्ष विनायकराव पाटील, वाळवा तालुका राष्ट्रवादीचे अध्यक्ष विजयबापू पाटील, जिल्हा परिषद सदस्य रणजित पाटील, इस्लामपूर पालिकेतील बहुतांशी नगरसेवक आणि उद्योगसमूहातील पदाधिकारी याच गटात मोठ्या प्रमाणात आहेत. त्यांनाही थेट प्रचारात सहभागी होता येणार नसल्याचे खात्रीशीर वृत्त आहे.
संस्थापक पॅनलचे प्रमुख माजी अध्यक्ष अविनाश मोहिते यांनी वाळवा तालुक्यात राष्ट्रवादीचा पाठिंबा मिळविण्यासाठी प्रयत्न केले. परंतु, निवडणुकीपूर्वी जयंत पाटील यांनी भूमिका जाहीर केली नाही. त्यामुळे आता वाळवा तालुक्यात सर्व गटातील लढती मैत्रीपूर्ण असतील हे निश्चित झाले आहे.