इस्लामपूर : शहीद डॉ. नरेंद्र दाभोलकर हे विवेकाची बिजे पेरणारे प्रकाशयात्री होते. माणूस घडवण्याचे अभियान त्यांनी चालवले. सुंदर आणि आनंदी समाज व्हावा, यासाठी ते धडपडत होते, असे मत ज्येष्ठ पत्रकार आणि हिंदीतील नामवंत साहित्यिक विश्वनाथ सचदेव यांनी व्यक्त केले.
शहीद डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या आठव्या स्मृतिदिनी महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्यावतीने आयोजित ऑनलाईन अभिवादन सभेत ते बोलत होते. ज्येष्ठ साहित्यिक उत्तम कांबळे या सभेच्या अध्यक्षस्थानी होते.
सचदेव म्हणाले, व्यवस्था परिवर्तनासाठी सतत प्रश्न विचारत राहिले पाहिजे. डॉ. दाभोलकरांनी प्रश्न विचारायची परंपरा सुरु ठेवली, त्यांनी इथल्या अंधश्रद्धा, शोषणाबद्दल प्रश्न विचारले, व्यापक जनचळवळ उभी केली आणि हीच बाब धर्मांध सनातनी लोकांना खटकली. जे संविधानाचा अपमान करतात, त्यानुसार वागत नाहीत त्यांना देशद्रोही ठरवले पाहिजे. संविधानिक मूल्यांचा आग्रह धरणाऱ्या डॉ. दाभोलकरांचे खुनी पकडले जात नाहीत, ही बाब देशातील लोकांना चिंतेची वाटली पाहिजे.
उत्तम कांबळे म्हणाले, शस्त्रापेक्षा शब्दाची भीती वाटणाऱ्या निरर्थक मूलतत्ववादी मानसिकतेतून डॉ. दाभोलकर यांचा खून झाला. मात्र, त्यांच्या सर्व कार्यकर्त्यांनी न डगमगता अधिक खंबीरपणे विवेकाचा जागर सुरू ठेवला आहे. डॉ. दाभोलकर ही एक व्यक्ती नव्हते, तो विचार होता, एक आंदोलन होते. त्यांना संपवल्यावर तो विचार संपेल, असे मारेकऱ्यांना वाटले असेल पण आज दाभोलकरांनी सुरू केलेली चळवळ अधिक वाढत आहे. इथल्या व्यवस्थेला डॉ. दाभोलकरांचे खुनी पकडायचेच नाहीत, राजकीय इच्छाशक्ती नाही त्याचा आपण सतत निषेध करत राहिले पाहिजे.
माधव बावगे यांनी स्वागत व प्रास्ताविक केले. संजय बनसोडे यांनी सूत्रसंचालन केले. यावेळी राज्य कार्याध्यक्ष अविनाश पाटील, सुशीला मुंडे, नंदकिशोर तलाशीलकर, सुधाकर काशीद, संजय शेंडे उपस्थित होते. नितीन राऊत यांनी आभार मानले.