वाळवा : वाळव्यातून क्रांतिवीर डॉ. नागनाथअण्णा यांनी स्वातंत्र्य लढ्याचे रणशिंग फुंकले. त्यातून त्यांना तुरुंगवास भोगावा लागला, पण सातारा जेल फोडून त्यांनी पुन्हा भारतीय स्वातंत्र्य लढ्यात उडी घेतली. नागनाथअण्णा यांचे कार्य हे भावी पिढीला प्रेरणादायी ठरेल, असे प्रतिपादन प्रा. विकास शिंदे यांनी केले.
हुतात्मा किसन अहिर माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय वाळवा येथे आयोजित क्रांतिवीर डॉ. नागनाथअण्णा नायकवडी यांच्या ऐतिहासिक अशा सातारा जेल फोडो या घटनेला १० सप्टेंबर रोजी ७७ वर्षे पूर्ण झाली, त्यानिमित्ताने आयोजित शौर्य दिन कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी मुख्याध्यापक एस. एस. खणदाळे, पर्यवेक्षक व्ही. बी. पाटील, आर. एन. मुल्ला, शिवराज पाटील उपस्थित होते.
प्रा शिंदे म्हणाले, क्रांतिवीर डॉ. नागनाथअण्णा नायकवडी यांनी भारतीय स्वातंत्र्य लढ्यातील सातारा जेलमधून घेतलेली ऐतिहासिक उडी ही भारतीय इतिहासात सुवर्णाक्षरांनी लिहिण्याचा क्षण आहे.
मुख्याध्यापक एस. एस. खणदाळे यांनी क्रांतिवीर डॉ. नागनाथ अण्णा नायकवडी यांच्या प्रतिमेचे पूजन करून अभिवादन केले. सांस्कृतिक विभागप्रमुख आर. एन. मुल्ला यांनी स्वागत व प्रास्ताविक केले. शिवराज पाटील यांनी आभार मानले.