ऐतवडे बुद्रुक : ऐतवडे बुद्रुक (ता. वाळवा) येथे केंद्रीय पुरातत्त्व विभागाच्या प्रादेशिक संचालक डॉ. नंदिनी साहू यांनी येथील माळावर असणाऱ्या दगडी चक्रव्यूह स्थळांना भेट दिली. ही चक्रे कोणी व कोणत्या कालखंडात तयार केली असावीत, याबाबत शोधनिबंध व स्थळपाहणी करण्यात आली.
हा दगडी चक्रव्यूह तयार करण्यामागचा उद्देश, प्राचीन व्यापारी मार्ग, घटनास्थळावरील काही सूक्ष्म निरीक्षणे नोंदवण्यात आली. दगडावर कोरून काढलेली वलये तसेच परिसरातील सापडलेले पुरातत्त्वीय अवशेष यांचीही पाहणी डॉ. नंदिनी साहू यांच्यासह पथकाने केली.
पाहणी पूर्ण झाल्यानंतर त्यांनी प्राचीन भारतीय व्यापारी मार्ग व इतिहासपूर्व कालखंडातील व्यापार या गोष्टींचा दुवा तसेच या चक्रव्यूह संरचनेचे ठिकाण, व्यापारी मार्ग यांचा परस्पर संबंध तपासण्यात आला. जंगम वस्ती परिसरातील सापडलेल्या या पुरातत्त्वीय अवशेषांची पाहणी व परिसरातील काही ठिकाणांचे उत्खनन करण्याबाबतही डॉ. साहू यांनी मार्गदर्शन केले.
शहाजी गायकवाड यांनी डॉ. साहू यांचे स्वागत यांनी केले. डॉ. साहू यांच्या भेटीमुळे ऐतवडे बुद्रुक परिसरामध्ये सापडलेल्या पुरातत्त्वीय अवशेषांची संवर्धन व जतन हे येणाऱ्या कालखंडातील युवा संशोधकांसाठी फार महत्त्वपूर्ण ठरणार आहे, असे प्रतिपादन शहाजी गायकवाड यांनी केले.
यावेळी केंद्रीय पुरातत्त्व पथकाचे अधिकारी सौरभ मेहता, अभियंता नीलेश सोनवणे व कोल्हापूर येथील इतिहास अभ्यासक गणेश नेर्लेकर-देसाई, कुरळपचे खंडेराव घनवट उपस्थित होते.
चाैकट
लंडनमध्ये शोधनिबंध प्रसिद्ध
यापूर्वी पुरातत्त्व अभ्यासक सचिन पाटील यांना ह्या संरचना दाखविण्यात आल्या. त्यांनी गेली पाच वर्षे डेक्कन कॉलेजचे पुरातत्त्व शाखेचे विभागप्रमुख डॉ. साबळे यांच्या मार्गदर्शनाखाली सखोल अभ्यास करून याबाबतचा शोधनिबंध लंडन येथील केडोरिया द जर्नल ऑफ मेझ अँड लिब्रिन्थ या सुवर्णमहोत्सवी मॅगझिनमध्ये प्रकाशित केला. त्यानंतर या अवशेषांचे महत्त्व सर्वांच्या लक्षात आले, असे शहाजी गायकवाड यांनी सांगितले.