लोकमत न्यूज नेटवर्क
शिराळा : शिराळा पूर्व व मध्य भागातील गावांना वरदान ठरणारा मोरणा मध्यम प्रकल्प इतिहासात प्रथमच जून महिन्यातच १०० टक्के भरला आहे. इस्लामपूर पाटबंधारे विभागाचे उपविभागीय अभियंता लालासाहेब मोरे यांच्या हस्ते येथे पाणीपूजन करण्यात आले.
यावेळी मोरे म्हणाले, या वर्षी मोरणा धरणाबरोबरच, वाकुर्डे येथील करमजाई, अंत्री येथील माणकरवाडी, टाकवे व वाळवा तालुक्यातील रेठरे धरण हे पाचही प्रकल्प भरल्याने रब्बीअखेर पिकांचा पाणीप्रश्न सुटला आहे. उन्हाळी हंगामात वाकुर्डे बुद्रुक योजनेचे पाणी या प्रकल्पात घेऊन वर्षभर पुरेसे पाणी शेतकऱ्यांना देण्याचे नियोजन करण्यात आले आहे.
मोरणा प्रकल्पाबरोबरच करमजाई, माणकरवाडी, टाकवे, रेठरे धरण येथेही पाणीपूजन करण्यात आले. यावेळी शाखा अभियंता एस.के. पाटील, अनिल पाटील, चंद्रकांत यादव, श्रीपती देसाई आदी उपस्थित होते.