संख : दरीबडची (ता. जत) येथील दिलीप महादेव वाघे (वय २६) या युवकाचा खून अनैतिक संबंधातून झाल्याचे उघडकीस आले. संशयित संजय कोंडिबा करे (३५, खंडनाळ), यशवंत उजना हाक्के (५५), नवनाथ यशवंत हाक्के (२७, रा. दोघे मोटेवाडी आसंगी) यांना अटक केली असून गुन्ह्यात एका अल्पवयीन मुलाचा सहभाग आहे.
मृत दिलीप आणि संशयित संजय करे गेल्या वर्षी ऊसतोडणीला एकत्र होते. दिलीप ट्रॅक्टरचालक होता. तेव्हापासून दोघांचे एकमेकांच्या घरी जाणे-येणे होते. दोघांनी यावर्षी कारखान्याला ऊसतोडणीचा करार केला होता. ऊसतोडणीतच दिलीपचे संजय करेच्या पत्नीबरोबर अनैतिक संबंध जुळले होते. याची माहिती संजयला मिळाल्यानंतर त्याला ताकीद दिली होती, तरीसुद्धा संबंध सुरू होते. संजयने कायमचा बंदोबस्त करण्यासाठी सासरे यशवंत हाक्के, मेहुणे नवनाथ हाक्के व अल्पवयीन मेहुण्यास बोलवून घेतले.
गुरुवारी रात्री दिलीपला संजयने फोन करून घरातून करे वस्तीवर बोलावून घेतले होते. तो दुचाकीवरून (एमएच १० सीजे ३२४४) गेला होता. रात्री दहाच्या दरम्यान त्याला रस्त्यावरच अडवून चौघांनी एसटीपी पाईपने हातपाय बांधून, तोंडात कापड कोंबून जबर मारहाण केली. त्यात त्याचा मृत्यू झाला. रात्री तोंड दाबल्याने आरडाओरड करता आली नाही. रिमझिम पाऊस असल्याने याची माहिती मिळाली नाही. सामसूम झाल्यावर दीड किलोमीटरवरील वनक्षेत्रातील कच्च्या रस्त्यावर निर्जन ठिकाणी गाडी व मृतदेह टाकला आणि अपघाताचा बनाव केला.
जतचे पोलीस निरीक्षक अप्पासाहेब कोळी, सहायक निरीक्षक गोपाळ भोसले व महेश मोहिते, युवराज घोडके यांनी वेगाने तपास करून संशयितांना अटक केली.