सांगली : महापालिकेच्या स्थायी समितीची सभा पुन्हा ऑनलाईन घेण्यात येणार आहे. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेपूर्वी ऑफलाईन सभा सुरू होती. शासनाने सभा पुन्हा ऑनलाईन घेण्याचे निर्देश दिले आहेत. येत्या शुक्रवारी स्थायी समितीची सभा होत असून या सभेत औषध खरेदी, ऑक्सिजनची बिले, जैव वैद्यकीय कचरा ठेकेदाराला मुदतवाढीचे विषय अजेंड्यावर घेण्यात आले आहेत.
कोरोनाची पहिली लाट ओसरल्यानंतर शासनाच्या नगरविकास विभागाने स्थायी समितीसह विषय समित्यांच्या सभा ऑफलाईन घेण्यास मंजुरी दिली. महासभा वगळता सर्वच बैठकी ऑफलाईन सुरू झाल्या. एप्रिल-मे महिन्यात कोरोनाची दुसऱ्या लाट आली. नगरविकास विभागाने ६ मे रोजी परिपत्रक प्रसिद्ध करीत पुन्हा सर्वच सभा ऑनलाईन घेण्याचे निर्देश दिले. त्यानुसार येत्या शुक्रवारी स्थायी समितीची ऑनलाईन सभा आयोजित करण्यात आली आहे.
या सभेत आरोग्य केंद्रासाठी ॲलोपॅथी औषधे, सर्जिकल साहित्य, केमिकल, वैद्यकीय उपकरणे खरेदीसाठी ७६ लाख रुपयांच्या खर्चास मान्यता देण्याचा विषय घेण्यात आला आहे. शहरातील जैव वैद्यकीय कचरा प्रक्रियेच्या ठेकेदाराला मुदतवाढ देऊन नवीन निविदा प्रक्रिया राबविणे, महापालिकेच्या कोविड रुग्णालयाला ऑक्सिजन पुरवठ्याचे बिल अदा करणे, अभयनगर येथील खुल्या भूखंडाला कंपाऊंड भिंत घालणे, कुपवाडच्या मंगळवार बाजार रस्ता डांबरीकरण निविदेला मान्यता देण्याचा विषयही चर्चेला घेण्यात आला आहे.