सांगली : जिल्हा प्रशासनाने नियुक्त केलेल्या ठेकेदाराकडूनच विनानिविदा १० व्हेंटिलेटर्स खरेदी करण्याचा निर्णय बुधवारी महापालिकेच्या स्थायी समितीमध्ये घेण्यात आला. दरम्यान, मिरजेत जैववैद्यकीय कचऱ्याची विल्हेवाट लावण्यासाठी प्रकल्प सुरू करण्याबाबत कोणताही निर्णय महासभेत घेण्यात आला नाही.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर व्हेंटिलेटर्स खरेदी व बायो मेडिकल वेस्ट प्रकल्पाच्या निर्णयाकडे सर्वांचे लक्ष राहिले होते. एक विषय स्थायी समितीकडे, तर दुसरा महासभेत चर्चेला आला. महापालिका स्थायी समितीची ऑनलाईन सभा बुधवारी सभापती पांडुरंग कोरे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. यावेळी ५५ लाख रुपये खर्च करून जिल्हा प्रशासनाने नियुक्त केलेल्या कंपनीकडूनच १० व्हेंटिलेटर्स खरेदी करण्यावर शिक्कामोर्तब करण्यात आले.
दरम्यान, महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत जैववैद्यकीय कचऱ्याच्या विघटनाच्या प्रकल्पावरून जोरदार चर्चा झाली. सभेत काँग्रेसचे शेडजी मोहिते व संगीता हारगे यांनी यांनी मिरजेत बेडग रोडवर असलेले जैववैद्यकीय कचरा विघटन प्रकल्प मिरज आयएमए या संस्थेला चालविण्यास देण्याचा प्रस्ताव ‘१-ज’ अंतर्गत आणला होता. या प्रस्तावाला उपमहापौर उमेश पाटील यांच्यासह काँग्रेसच्या सदस्यांनी सभेपूर्वीच विरोध केला.
शेडजी मोहिते म्हणाले की, हा प्रकल्प शिरोली येथील संस्थेला चालविण्यास देण्याचा ठराव महासभेत झाला होता. मात्र, ही संस्था नोंदणीकृत नाही, त्यांना या कामाचा अनुभव नाही; मात्र या प्रकल्पासाठी मिरजेतील डॉक्टरांच्या आयएमए संस्थेने लाखो रुपयांची गुंतवणूक केली आहे. दोन वर्ष त्यांनी प्रकल्प योग्य पद्धतीने चालविला आहे. महापालिकेने त्यांना काही दुरस्ती व प्रदूषण मंडळाचा परवाना घेण्यास सांगितले होते. त्यामुळे प्रकल्प बंद ठेवला होता. हे कामही या संस्थेने पूर्ण केले आहे. शिवाय या कंपनीचा आणि पालिकेचा दहा वर्षांचा करार आहे, तो अजून वैध आहे. त्यामुळे या संस्थेला हा प्रकल्प द्यावा, अशी मागणी केली.
चाैकट
चर्चेवेळी सभा संपल्याची घोषणा
महापौर सूर्यवंशी यांनी या विषयावर कोणतेही आदेश दिले नाहीत. अन्य कोणत्या सदस्यांना बाेलण्याची संधीही दिली नाही. त्यांनी थेेट संभा संपल्याचे जाहीर केले. त्यामुळे या विषयावर नेमका निर्णय काय झाला? याबाबत संभ्रमावस्था निर्माण झाली आहे.