सांगली : शहरातील आठवडी बाजार संपताच विक्रेते रस्त्यावर कचरा टाकून जातात; पण आता महापालिका आयुक्त सत्यम गांधी यांनी विक्रेत्यांसाठी नवे निर्देश जारी केले आहेत. बाजार संपल्यानंतर कचरा रस्त्यावर नव्हे तर महापालिकेने निश्चित केलेल्या ठिकाणी ट्रॅक्टर अथवा कंटेनरमध्येच टाकण्याचे बंधन घातले आहे. याबाबत महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी बाजार परिसरात जनजागृती मोहीमही राबविली.शहरात दररोज कुठे ना कुठे आठवडी बाजार भरत असतो. या बाजारात फळ, भाजी विक्रेत्यांपासून कापड व्यावसायिकांपर्यंत हजारो विक्रेते व्यवसाय करीत आहेत; पण बाजार संपल्यानंतर उरलेली भाजीपाला, फळे, प्लास्टिक पिशव्या रस्त्यावर टाकून विक्रेते निघून जातात. हा कचरा महापालिकेच्या स्वच्छता कर्मचाऱ्यांना उचलावा लागतो. ‘स्वच्छ सांगली’ उपक्रमांतर्गत आता आठवडी बाजारात कचरा व्यवस्थापनाचे कठोर निर्देश आयुक्त सत्यम गांधी यांनी दिले आहेत. त्याबाबत उपायुक्त स्मृती पाटील, मुख्य स्वच्छता अधिकारी सचिन सागावकर, स्वच्छता अधिकारी याकूब माद्रासी व अतुल आठवले आणि सर्व स्वच्छता निरीक्षकांनी शनिवारच्या आठवडा बाजारात जनजागृती केली.बाजारातील फळविक्रेते, भाजी विक्रेत्यांसह सर्वच व्यावसायिकांनी दैनंदिन व्यवसाय संपल्यानंतर शिल्लक राहणारा कचरा इतरत्र न टाकता तो एकत्र करून महापालिकेनेनिश्चित केलेल्या ठिकाणी ट्रॅक्टर किंवा कंटेनरमध्येच टाकणे बंधनकारक करण्यात आले आहे. या नियमांचे काटेकोरपणे पालन करण्याच्या सूचना विक्रेत्यांना देण्यात आल्या. या मोहिमेत फळ-भाजी विक्रेते संघटनेचे अध्यक्ष आणि कमिटी सदस्य सहभागी झाले होते. बाजार संपल्यानंतर कचरा रस्त्यावर पडून राहणार नाही, याची दक्षता घेण्याचे आश्वासनही विक्रेता संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी दिले.
Web Summary : Sangli's weekly market vendors must now dispose of waste in designated containers, not on streets. The Municipal Corporation, under Commissioner Satyam Gandhi, is enforcing stricter waste management for a cleaner Sangli. Awareness campaigns are underway with vendor cooperation.
Web Summary : सांगली के साप्ताहिक बाजार विक्रेताओं को अब कचरा सड़कों पर नहीं, निर्धारित कंटेनरों में डालना होगा। आयुक्त सत्यम गांधी के नेतृत्व में नगर निगम स्वच्छ सांगली के लिए सख्त कचरा प्रबंधन लागू कर रहा है। विक्रेता सहयोग के साथ जागरूकता अभियान जारी हैं।