सांगली : सांगली- मिरज रोडवरील हेल्थ पॉइंट केअर युनिटने अग्निशामक परवाना घेतला नसल्याने महापालिकेने रुग्णालयाची ना हरकत दाखला (एनओसी) रद्द केला आहे. आयुक्त नितीन कापडणीस यांच्या आदेशाने उपायुक्त स्मृती पाटील यांच्या पथकाने सोमवारी ही कारवाई केली.
भंडारा जिल्हा रुग्णालयातील दुर्घटनेनंतर आयुक्त कापडणीस यांनी खासगी रुग्णालयाकडील अग्निशमन परवान्याची तपासणी करण्याचे आदेश अग्निशमन विभागाला दिले आहेत. गेल्या दोन दिवसात अग्निशमन विभागाकडून २९६ आस्थापनांची तपासणी करण्यात आली आहे. महापालिकेकडे २८६ नोंदणीकृत रुग्णालये आहेत. यातील १० टक्के रुग्णालयांनी अग्निशमन विभागाचा परवाना घेतला नसल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. त्यामध्ये सांगली-मिरज रोडवरील हेल्थ पॉइंट केअर युनिटने कोविड काळात महापालिकेकडून तात्पुरता ना हरकत दाखला घेतला होता. मात्र तो दाखला कायम केला नाही. परवाना न घेताच रुग्णालय सुरू ठेवले. त्यामुळे या रुग्णालयाची महापालिकेकडून देण्यात आलेली एनओसी रद्द करण्यात आली आहे.
चौकट
आपत्ती कायद्याखाली कारवाई : कापडणीस
अग्निशमन विभागाचा परवाना न घेताच रुग्णालये सुरू असल्याची बाब समोर येत आहे. रुग्णालय प्रशासनाने तातडीने अग्निशमन यंत्रणा बसवून महापालिकेकडे परवानासाठी अर्ज करावेत. परवाना न घेणाऱ्या रुग्णालयावर आपत्ती व्यवस्थापन कायद्यान्वये कारवाई केली जाईल, असा इशारा आयुक्त नितीन कापडणीस यांनी दिला आहे.