लोकमत न्यूज नेटवर्क
सांगली : राहत्या जागेमध्ये असलेला विद्युत खांब काढण्यासाठी साडेपाच हजाराची लाच स्वीकारताना महावितरणच्या लाईनमनला सोमवारी रंगेहात पकडण्यात आले. मयूर जयवंत साळुंखे (वय ४३, रा. मूळ नांद्रे, ता. मिरज, सध्या एमएसईबी कॉलनी, सांगली) असे त्याचे नाव असून, खांब काढण्याचे काम सुरू असताना सापळा लावून लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने ही कारवाई केली.
कोल्हापूर रस्त्यावरील खिलारे मंगल कार्यालयाच्या परिसरातील तक्रारदाराच्या जागेमध्ये विद्युत खांब होता. तो खांब काढण्यासाठी तक्रारदाराने साळुंखे याच्याशी संपर्क साधला होता. यावेळी त्याने १६ हजार रुपयांच्या लाचेची मागणी केली. त्यातील १० हजार रुपये त्याने अगोदरच स्वीकारले होते, तर उर्वरित सहा हजारांची तो मागणी करत होता. त्यानंतर तक्रारदाराने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाशी संपर्क साधून तक्रार दाखल केली. त्यानुसार सोमवारी पथकाने तक्रारदाराच्या घराजवळ सापळा लावला होता., लाईनमन साळुंखे याने सहा हजाराची मागणी केली. चर्चेअंती साडेपाच हजाराची लाच स्वीकारत असताना त्यास रंगेहात पकडण्यात आले. त्यानंतर त्याच्यावर लाचलुचपत प्रतिबंधक अधिनियमानुसार शहर पोलिसात गुन्हा दाखल करण्याचे काम रात्री उशिरापर्यंत सुरू होते.
उपअधीक्षक सुजय घाटगे यांच्या मार्गदर्शनाखाली निरीक्षक प्रशांत चौगुले, गुरुदत्त मोरे, धनंजय खाडे, संजय कलकुटगी, अविनाश सागर, रवींद्र धुमाळ आदींच्या पथकाने ही कारवाई केली.
चौकट
महावितरणचा तिसरा कर्मचारी जाळ्यात
लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने कारवाईचा धडाका सुरूच ठेवला आहे. विशेष म्हणजे या आठवड्यातच महावितरणचा तिसरा कर्मचारी लाच घेताना पकडण्यात आला आहे. गेल्या आठवड्यात देशिंग येथील दोन कंत्राटी वायरमनना लाच घेताना रंगेहात पकडण्यात आले होते.