खासदार-सरकार संघर्षाची चिन्हे
By Admin | Updated: June 15, 2015 00:18 IST2015-06-15T00:11:32+5:302015-06-15T00:18:53+5:30
बाजार समिती निवडणूक : अजितराव घोरपडेंचे तासगाव बाजार समितीत पॅनेल?

खासदार-सरकार संघर्षाची चिन्हे
दत्ता पाटील, तासगाव :सहकारी संस्थांच्या हितासाठी बिनविरोधचा ढोल वाजविला जात असला तरी, छुप्या संघर्षाचे रागही यानिमित्ताने आळविले जात आहे. तासगाव कृषी उत्पन्न बाजार समितीची निवडणूक बिनविरोध करण्यासाठी एकीकडे भाजप व राष्ट्रवादीची खलबते सुरू असतानाच माजी मंत्री अजितराव घोरपडे यांचे समर्थक असणारे अॅड. स्वप्नील पाटील यांनी स्वतंत्र पॅनेल उभारण्याच्या दृष्टीने हालचाली सुरू केल्या आहेत. त्यामुळे खासदार-सरकार यांच्यातील छुपा संघर्ष ऐरणीवर येण्याची चिन्हे दिसत आहेत.
तासगाव कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत संस्थेच्या हितासाठी बिनविरोधसाठी तयारी असल्याचे मत खासदार संजय पाटील यांनी व्यक्त केले होते. राष्ट्रवादीतीलही एक गट बिनविरोधसाठी अनुकूल आहे. दोन्ही पक्षातील काही पदाधिकाऱ्यांनी स्वबळावर लढण्याची मागणी केली आहे. या निवडणुकीच्या बाबतीत भाजप आणि राष्ट्रवादीत खलबते सुरु असतानाच, भाजपमधील खासदार संजय पाटील आणि माजी आमदार अजितराव घोरपडे यांच्यातील छुपा संघर्ष ऐरणीवर येण्याची चिन्हे दिसत आहेत.
तत्कालीन गृहमंत्री आर. आर. पाटील आणि माजी आमदार अजितराव घोरपडे यांच्यात विधानसभा निवडणुकीचा सामना रंगला होता. या निवडणुकीत घोरपडे पराभूत झाले. तेव्हापासून घोरपडे आणि खासदार संजय पाटील यांच्यात अंतर पडण्यास सुरुवात झाली. आर. आर. पाटील यांच्या निधनानंतर झालेल्या पोटनिवडणुकीत भाजपचे अॅड. स्वप्नील पाटील यांनी बंडखोरी करुन निवडणूक लढवली. त्यावेळी खासदार पाटील यांनी अॅड. पाटील यांच्या उमदेवारीशी कोणताही संबंध नसल्याचे स्पष्ट केले होते. परंतु अजितराव घोरपडे गटाने स्वप्नील पाटील यांना अप्रत्यक्षपणे पाठिंबा दिला होता.
घोरपडेंचे प्राबल्य असणाऱ्या काही गावात मताधिक्यही मिळाले होते. तेव्हापासून अॅड. पाटील आणि घोरपडेंची जवळीकता निर्माण झाली. मात्र घोरपडे आणि खासदार यांच्यातील अंतर वाढले. काही दिवसांपूर्वीच घोरपडे समर्थक बाजार समितीचे माजी उपसभापती रमेश साबळे यांनी खासदार संजय पाटील यांच्या उपस्थितीत भाजप प्रवेश केला होता. मुळात घोरपडे समर्थक असताना साबळे यांनी पुन्हा भाजपात प्रवेश केल्यामुळे सरकार आणि खासदार यांच्यातील रुंदावलेली राजकीय दरी उघड झाली आहे.
खासदारांनी कवठेमहांकाळमध्ये पक्षप्रवेशाचा कार्यक्रम घेऊन शह दिल्यानंतर, आता अजितराव घोरपडेंनीही तासगावमध्ये काटशह देण्यासाठी हालचाल सुरू केल्याचे दिसून येत आहे. राष्ट्रवादी आणि भाजपची तडजोड झाल्यास स्वतंत्र पॅनेल लावणार असल्याची भूमिका स्वप्नील पाटील यांनी स्पष्ट केली आहे. त्यांच्या पॅनेलला घोरपडेंचे पाठबळ असून, खासदार पाटील यांच्याविरोधात बाजार समिती निवडणुकीच्यानिमित्ताने अजितराव घोरपडे आक्रमक होणार असल्याची शक्यताही व्यक्त होत आहे.
घोरपडे समर्थकांची गैरहजेरी
बाजार समिती निवडणुकीच्यानिमित्ताने खासदार पाटील यांच्या चिंंचणी येथील बंगल्यावर भाजपच्या कार्यकर्त्यांची बैठक झाली होती. या बैठकीला स्वप्नील पाटील यांच्यासह घोरपडे समर्थकांची गैरहजेरी होती. त्यामुळे खासदार-सरकार गट बाजार समितीच्या निमित्ताने एकत्रित राहणार की विरोधात, याबाबत तालुक्यात उत्सुकता निर्माण झाली आहे. तसेच सांगली कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत घोरपडे आमच्यासोबत असतील, असे काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष मोहनराव कदम यांनी स्पष्ट केले आहे. त्यामुळे तासगावातही काँग्रेस आणि सरकार गट एकत्रित येतील काय? याकडे लक्ष लागून राहिले आहे.
अशी रुंदावली दरी
४विधानसभा निवडणुकीतील पराभवानंतर घोरपडे-खासदार यांच्यातील संपर्क थांबला
४विधानसभा पोटनिवडणुकीत भाजपचे बंडखोर स्वप्नील पाटील यांना घोरपडे समर्थकांचे पाठबळ
४जिल्हा बँकेच्या निवडणुकीत आमदार जयंत पाटील यांच्या नेतृत्वाखालील पॅनेलमध्ये खासदार संजय पाटील यांचा समावेश, अजितराव घोरपडे तटस्थ
४राष्ट्रवादीतून घोरपडेंच्या गटात आलेल्या रमेश साबळे यांचा खासदारांच्या गटात प्रवेश
४आता घोरपडेंच्या नेतृत्वाखाली अॅड. स्वप्नील पाटील यांची बाजार समितीसाठी मोर्चेबांधणी