डफळापूर : शेतजमिनीच्या वादातून पकड वॉरंट निघाल्याने फरार झालेल्या भारत कुंडलिक इरकर (वय ४५) याने धारदार हत्याराने वार करून आई, पत्नीसह दोन मुलींची हत्या केली. ही घटना कुडणूर (ता. जत) येथे शनिवारी पहाटे साडेपाचच्या सुमारास घडली. आई सुशीला कुंडलिक इरकर (६५), पत्नी शिंदूबाई (४०), मुलगी रूपाली (१९) व राणी (१७) अशी मृतांची नावे आहेत. भारत स्वत:हून जत पोलिसांत हजर झाला. या घटनेने जिल्ह्यात खळबळ उडाली आहे.भारत इरकरचे वडील कुंडलिक परिसरात जमीनदार म्हणून प्रसिद्ध होते. त्यांना सहा पत्नी होत्या. त्यांच्याकडील ६४ एकर जमिनीपैकी ३२ एकर जमीन ते हयात असतानाच विकली होती. त्यांच्या पश्चात उर्वरित जमिनीतील सोळा एकर भारतने विकली असून, स्वत:च्या व दोन मुलांच्या नावे प्रत्येकी आठ एकर जमीन केली आहे. मात्र, ही सर्व जमीन मिळावी यासाठी भारतची सावत्र आई जनाबाई इरकर (सध्या रा. सांगली) यांनी न्यायालयात धाव घेतली आहे. हा वाद उच्च न्यायालयापर्यंत गेला आहे. भारत तारखेला हजर न राहिल्यामुळे त्याच्यावर पकड वॉरंट निघाले होते. गेली सहा महिने तो फरारी होता. दरम्यानच्या काळात जनाबाई यांच्या बाजूने वादाचा निकाल लागला होता. त्यामुळे पोलिस बंदोबस्तात जमिनीचा ताबा घेण्याचा प्रयत्न झाला होता. जमीन मोजणीही झाली होती.या वादात गेली सहा महिने फरारी असलेला भारत शुक्रवारी रात्री घरी आला. यावेळी दोन मुले म्हाळाप्पा (१४) व आकाश (१२) आत्याकडे अभ्यास करण्यासाठी गेली होती. ती तेथेच जेवण करून झोपली. पहाटे साडेपाचच्या सुमारास भारतची आई सुशीला व पत्नी शिंदूबाई दोन मुलींसह शेतात बाजरीतील तण काढण्यासाठी गेल्या. त्यावेळी भारतने त्यांच्यावर धारदार हत्याराने अचानक हल्ला केला. डोक्यावर वर्मी घाव बसल्याने चौघीही जागीच ठार झाल्या. त्यानंतर भारत तेथून निघून गेला. दरम्यान, भारतची दोन मुले सकाळी शाळेला जाण्यासाठी घरी आली. यावेळी घरात कोणीच नव्हते. ते दोघे दप्तर घेऊन शिंगणापूर येथील शाळेला जाण्यासाठी शेतातून जात असताना त्यांना चार मृतदेह दिसले. हा प्रकार पाहून त्यांनी आरडाओरड केली. त्यानंतर तेथे आलेल्या ग्रामस्थांनी जत पोलिसांना कळविले.जतचे पोलिस निरीक्षक युवराज मोहिते सहकाऱ्यांसह तातडीने घटनास्थळी आले. जिल्हा पोलिसप्रमुख दत्तात्रय शिंदे, उपविभागीय पोलिस अधिकारी नागनाथ वाकुडे, पोलिस निरीक्षक बाजीराव पाटील यांनी घटनास्थळी भेट दिली. दरम्यान, भारत स्वत: जत पोलिसात हजर झाला. त्यानंतर पोलिस निरीक्षक मोहिते यांना भारत जत पोलिस ठाण्यात हजर झाल्याचे दूरध्वनीवरून समजले. तेथील पोलिस पथकाने त्याला घटनास्थळी आणले.या घटनेमुळे जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. (वार्ताहर)वारकरी भारत इरकरभारत हा वारकरी असल्याने तो नेहमी पंढरपूरला विठ्ठलाच्या दर्शनासाठी जात असे. भक्तिमार्गातील भारतकडून असे कृत्य घडल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे. जमीन ताब्यातून गेल्यानंतर कुटुंबाचे कसे होणार, या विवंचनेतून त्याने कुटुंबाला संपविण्याचा विचार केल्याची चर्चा घटनास्थळी होती. म्हाळाप्पा व आकाश ही मुले आत्याकडे गेल्याने वाचली, अशीही चर्चा होती.रूपालीला बारावीत ७१ टक्के गुणघरची परिस्थिती बेताची असल्याने सुशीला चिकू विकून नातवंडांचे शिक्षण पूर्ण करीत होत्या. भारतची मुलगी रूपाली कवठेमहांकाळ येथे महाविद्यालयीन शिक्षण घेत होती. तिला बारावीमध्ये ७१ टक्के गुण मिळाले होते. तिच्या विवाहाचीही तयारी सुरू होती. डफळापुरातील डफळे हायस्कूलमध्ये रूपाली व कुटुंबाला श्रद्धांजली वाहण्यात आली. गावापासून अडीच किलोमीटरवर वस्तीकुडणूरपासून अडीच किलोमीटरवर इरकर यांची वस्ती आहे. घटना घडली तेथे जवळपास वस्ती नसल्याने चौघींना वाचविण्यासाठी कोणीही आले नाही. घटनेनंतर भारतची दोन मुले म्हाळाप्पा व आकाश हताश होऊन बसले होते. इतर नातेवाईक त्यांचे सांत्वन करीत होते. भारतचा रक्ताने माखलेला शर्ट घरात सापडला.
आई, पत्नीसह दोन मुलींचा खून
By admin | Updated: September 11, 2016 00:21 IST