जत तालुक्यात म्हैसाळ योजनेचे काम सध्या सुरू आहे. परंतु कोरोनाच्या कारणाने कामाला म्हणावी तितकी गती नाही. त्यामुळे ४८ गावे पाणी केव्हा मिळणार या प्रतीक्षेत आहेत. या योजनेला मंजुरी मिळेल का नाही याची शंका आहे. या ४८ गावांसह अल्पशा पाणी मिळालेली १७ गावे अशा एकूण ६५ गावांना म्हैसाळ योजनेचे पाणी मिळालेले नाही.
ते म्हणाले की, म्हैसाळ योजनेच्या बेडग पंपगृहातून पाणी उचलून देणे शक्य आहे. यासाठी म्हैसाळ विस्तारित योजनेला तत्त्वतः मान्यता दिली होती. परंतु पुढील कार्यवाही अद्याप झालेली नाही. या संदर्भात जलसंपदामंत्र्यांची वारणाली येथे भेट घेतली होती. त्यावेळेस अधीक्षक अभियंता हनुमंत गुणाले व कार्यकारी अभियंत्यांसोबत सविस्तर चर्चा झाली होती. तेव्हा सर्वांनी योजना मंजूर करू, असा शब्द दिला होता. त्यामुळे लोकांमध्ये विश्वासाचे वातावरण तयार झाले होते. परंतु बराच कालावधी झाल्याने लोकांमध्ये साशंकता वाढू लागली आहे. तरीसुद्धा तुमच्यावर आजही जनतेचा विश्वास आहे. त्या विश्वासाला तडा जाऊ देऊ नका. १५ दिवसांत या विस्तारित योजनेला मंजुरी द्यावी, अन्यथा सर्व पक्षांच्या वतीने उपविभागीय अधिकारी कार्यालयावर मोर्चा काढू.