सांगली : सावकारी कर्ज देण्यासाठी सिक्युरिटी म्हणून दिलेल्या धनादेशाचा गैरवापर करून महिलेची दोन लाख ६२ हजार ७०० रूपयांची फसवणूक करण्यात आली. याप्रकरणी सुमन मारूती घोरपडे (रा. बेडग ता. मिरज) यांनी विजय उर्फ पप्पू फाकडे (रा. हरिपूर) याच्याविरोधात विश्रामबाग पोलिसात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, फिर्यादी घोरपडे यांनी संशयिताकडून सावकारी कर्ज घेतले होते. यावेळी सिक्युरिटीसाठी दिलेल्या धनादेशाचा गैरवापर करून १ लाखांचे कर्ज म्हणून ८० हजार दिले होते व २० हजार रूपये व्याजापोटी कापून घेण्यात आले होते. त्यानंतरही वेळोवेळी हप्ते मिळावेत, यासाठी घोरपडे यांच्या पतीला संशयित दमदाटी व शिवीगाळ करत होता. दिनांक १ फेब्रुवारी २०२० ते ४ फेब्रुवारी २०२१ या वर्षभराच्या कालावधीत शहरातील स्फूर्ती चौक येथील प्रांजली अपार्टमेंटमध्ये असलेल्या श्रीनिवास को आॅप. क्रेडिट सोसायटीमध्ये हा प्रकार घडला. बेकायदेशीरपणे सावकारी कर्ज देऊन धनादेशाचा गैरवापर करून फसवणूक करण्यात आल्याचे घोरपडे यांनी फिर्यादीत म्हटले आहे. त्यामुळे पोलिसांनी सावकारी अधिनियमानुसार संशयितावर गुन्हा दाखल केला आहे.