मिरज : मिरज शहरातील एकमेव असलेल्या महापालिकेच्या छत्रपती शिवाजी क्रीडांगणावर गेल्या तीन महिन्यांपासून पाणी साचले आहे. मैदानाचा तलाव झाल्याने दिवाळीच्या सुट्टीत खेळण्यासाठी मैदान नसल्याने खेळाडूंची व बालगोपाळांची अडचण झाली आहे. शहराच्या मध्यभागी असलेले छत्रपती शिवाजी क्रीडांगण खेळाडूंच्या सोयीचे आहे. या क्रीडांगणावर दररोज अनेक खेळाडू क्रिकेट व फुटबॉल खेळायचे, नागरिकांसाठी सकाळी फिरण्यासाठीही या मैदानाचा उपयोग होतो. मात्र आॅगस्ट महिन्यापासून क्रीडांगणावर सुमारे चार फूट पावसाचे पाणी साचल्याने क्रीडांगणास तलावाचे स्वरूप आले आहे. याबाबत महापालिकेकडे खेळाडूंनी वारंवार तक्रार करूनही उपययोजना करण्यात आलेली नाही. महापालिकेच्या मालकीच्या या मैदानाकडे महापालिका प्रशासनाचे सोयीस्कर दुर्लक्ष आहे. शहरातील क्रीडाप्रेमी नगरसेवकांनीही मैदानाच्या समस्येकडे दुर्लक्ष केले आहे. तीन महिन्यांपासून क्रीडांगणावर पाणी साचल्याने क्रीडांगणाची दुरवस्था झाली आहे. मैदानाच्या परिसरातील पावसाच्या पाण्याचा निचरा होत नसल्याने हे पाणी क्रीडांगणात साचते. यावर्षी पावसाचे प्रमाणही जास्त असल्याने पाणी मोठ्याप्रमाणात साचले आहे. साचलेल्या पाण्याचा निचरा करण्यासाठी महापालिकेने कोणतीही उपाययोजना केलेली नाही. क्रीडांगणावरील पाणी त्वरित काढण्याची मागणी क्रीडाप्रेमी व खेळाडू करीत आहेत. मिरजेत छत्रपती शिवाजी क्रीडांगण हे एकमेव खेळाचे मोठे मैदान असल्याने येथे क्रिकेट, फुटबॉलसह विविध क्रीडा स्पर्धा होतात. दिवाळीनिमित्त शाळांना सुट्टी असल्याने खेळाचा सराव करणाऱ्या शालेय विद्यार्थ्यांची व खेळाडूंची अडचण झाली आहे. या मैदानावर नेहमीच फुटबॉल स्पर्धा सुरू असतात. या दिवाळीच्या सुट्टीत क्रीडांगणावर खेळाऐवजी म्हैशी पाण्यात डुंबत असल्याचे चित्र आहे. याकडे लक्ष देण्याची मागणी होत आहे. (वार्ताहर)वारंवार आंदोलने करूनही दुर्लक्षक्रीडांगणाची दुरवस्था दूर करण्यासाठी क्रीडांगण बचाव समिती व खेळाडूंनी वारंवार आंदोलने केली आहेत. मात्र त्याची दखल घेण्यात आलेली नाही. पावसाळा अद्याप सुरू असल्याने पंप लावून मैदानात साचलेले पाणी काढता येत नसल्याचे महापालिका अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. नेत्यांच्या वाढदिवसानिमित्त फुटबॉल स्पर्धा आयोजित करून मोठ्याप्रमाणात निधी संकलन करणाऱ्या नगरसेवकांनी मैदानाच्या सुधारणेबाबत डोळेझाक केली आहे.
मिरजेचे शिवाजी क्रीडांगण बनले तळे
By admin | Updated: October 23, 2014 00:04 IST