मिरज : मिरज पंचायत समितीचे उपसभापती दिलीपकुमार पाटील यांनी सभापती त्रिशला खवाटे यांच्याकडे बुधवारी राजीनामा दिला. या पदावर किरण बंडगर यांची वर्षी लागण्याची शक्यता आहे.
मिरज पंचायत समितीत भाजपची सत्ता आहे. सभापती व उपसभापतीच्या प्रथम दोन निवडीनंतर खा. संजयकाका पाटील व आ. सुरेश खाडे यांनी इतर सदस्यांना पदाची संधी मिळावी यासाठी दोन्ही पदांसाठी चार महिन्यांचा कालावधी देण्याचा निर्णय घेतला. तो पूर्ण होताच पाटील यांनी उपसभापती पदाचा राजीनामा काँग्रेसचे गटनेते अनिल आमटवणे, काकासाहेब धामणे, विक्रम पाटील, अशोक मोहिते, कृष्णदेव कांबळे, सतीश कोरे, प्रमोद खवाटे यांच्या उपस्थितीत सभापती खवाटे यांच्याकडे दिला. इतर सदस्यांना पदाची संधी मिळावी यासाठी मुदतीत राजीनामा दिल्याचे त्यांनी सांगितले. भाजपकडून टाकळीचे सदस्य किरण बंडगर यांची वर्णी लागण्याची शक्यता आहे.
चौकट
विरोधकांचा विचार होणार का?
भाजप नेत्यांच्या मध्यस्थीमुळे काँग्रेस, राष्ट्रवादीसह इतर विरोधी पक्षांच्या सदस्यांनी प्रत्येक निवडीत सहकार्याची भूमिका घेतल्याने निवडी बिनविरोध पार पडल्या. या बदल्यात विरोधकांना सत्तेत संधी देण्याचा शब्द भाजपच्या नेत्यांनी दिला. मात्र, अद्याप तो अनुत्तरित आहे. या निवडीत तरी भाजप नेते शब्द पाळणार का, असा सवाल काँग्रेसचे गटनेते अनिल आमटवणे यांनी केला आहे.