मिरज पंचायत समिती उपसभापतीची दि. १७ फेब्रुवारी रोजी निवड होणार आहे. काँग्रेसने ८ सदस्यांच्या बळावर निवडणूक लढविण्याच्या हालचाली सुरू केल्या आहेत. नाराजीचा फायदा घेत निवडणुकीत आव्हान देण्याच्या विरोधकांच्या हालचालीने सत्ताधारी भाजपच्या गोटात अस्वस्थता आहे. काही सदस्यांनी याची माहिती खासदार पाटील यांना दिली. त्यांनी याची दखल घेत पक्षाच्या सदस्यांची मिरज येथील शासकीय विश्रामगृहात बैठक घेतली. या बैठकीत त्यांनी उपसभापती निवडीबाबत चर्चा केली.
पाटील म्हणाले, भाजपकडून उपसभापतिपदासाठी किरण बंडगर यांचा अर्ज दाखल केला जाईल. त्यांचीच उपसभापतिपदी निवड होईल, चार महिन्यांनंतर ते राजीनामा देतील. त्यानंतर विरोधी काँग्रेसला संधी दिली जाईल. पक्षातील सदस्यांनी बंडगर यांच्या पाठीशी राहावे. आपण बंडगर यांच्यासाठी निवडीत लक्ष घालणार आहे. पाटील यांनी नाराज सदस्यांशी भ्रमणध्वनीवरून संपर्क साधून बंडगर यांना सहकार्य करण्याची सूचना केली. यावेळी काकासाहेब धामणे, विक्रम पाटील, राहुल सकळे, उमेश पाटील, प्रमोद खवाटे यांच्यासह सत्ताधारी भाजपचे सदस्य उपस्थित होते.
चौकट
उमेश पाटील यांच्यावर जबाबदारी !
ग्रामपंचायतीच्या निवडणुकीच्या नाराजीचे परिणाम पंचायत समिती उपसभापती निवडीवर होऊ पाहत आहेत. काही सदस्य नाराजीतून बंडाच्या भूमिकेत आहेत. संजयकाका पाटील यांनी, हे बंड शांत करून सदस्यांची नाराजी दूर करण्याची जबाबदारी, बेडगचे भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष उमेश पाटील यांच्यावर सोपविली आहे.उद्या, मंगळवारी सरपंच निवडी आहेत. भाजपमध्ये दोन गट परस्परविरोधात लढले आहेत. भाजपमध्ये सरपंच निवडीवरून निर्माण झालेला वाद कसा मिटणार, यावरही उपसभापती निवडीचे भवितव्य अवलंबून आहे.
फोटो : ०७ मिरज १६
ओळ : मिरजेतील शासकीय विश्रामगृहात आयाेजित बैठकीत संजयकाका पाटील यांनी काकासाहेब धामणे, विक्रम पाटील, राहुल सकळे, किरण बंडगर, प्रमोद खवाटे, उमेश पाटील यांच्याशी चर्चा केली.