मिरज : मागील दोन ते अडीच महिन्यांपासून ठरावीक व्यवसाय व दुकाने बंद ठेवली तरीही कोरोना रुग्ण संख्येत घट होत नसल्याने साेमवारी व्यापाऱ्यांनी आक्रमक पावित्रा घेत दुकाने उघडण्यास परवानगी देण्याची मागणी केली. प्रांताधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन करीत दुकाने सुरू करण्याचा इशारा दिला.
शासन निर्बंधामुळे कोरोनाची साखळी तुटणार आहे का? अशी विचारणा करीत व्यापाऱ्यांनी प्रांताधिकारी कार्यालयासमोर आंदोलन केले. कोरोना संसर्ग थांबविण्यासाठी दूध व औषध दुकाने वगळता इतर सर्व दुकाने दहा दिवसांसाठी बंद करावीत किंवा सर्व दुकाने सरसकट सुरू ठेवावीत, अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली. व्यवसाय बंद असल्याने दुकानदार आर्थिक संकटात आहेत. निर्बंध असेच वाढत राहिल्यास दुकानदार कर्जबाजारी होणार आहेत. त्यामुळे प्रशासनाने परवानगी न दिल्यास सर्व व्यापारी दुकान सुरू करणार असल्याचा इशारा निवेदनाद्वारे प्रांताधिकारी समीर शिंगटे व उपायुक्त स्मृती पाटील यांना देण्यात आला.
प्रांताधिकारी शिंगटे यांनी प्रशासनाला सहकार्याचे आवाहन केले. यावेळी व्यापारी संघटनेचे अशोक शहा, विराज कोकणे, गजेंद्र कुळ्ळोळी, अभय गोगटे, बंडू शेटे, महेश बेडेकर, प्रसाद मदभावीकर, आप्पा कोरे, राजू पवार, ओंकार शिखरे, अजित माने, सचानंद आहुजा, पुरषोत्तम कुलकर्णी, बंडू कोपार्डे यांच्यासह शहरातील व्यापारी उपस्थित होते.