फाेटाे : ०७ गितांजली कणसे
मिरज : मिरज पंचायत समितीच्या सभापती त्रिशला खवाटे यांनी मुदत पूर्ण होताच सोमवारी पदाचा राजीनामा जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा प्राजक्ता कोरे यांच्याकडे सुपूर्द केला. सभापतिपदासाठी भाजपकडून बेडगच्या सदस्या गीतांजली कणसे यांचे नाव निश्चित मानले जात आहे.
मिरज पंचायत समितीत भाजपचे बहुमत असताना सध्या भाजप व महाविकास आघाडीची संमिश्र सत्ता आहे. भाजपच्या त्रिशला खवाटे या सभापती असताना भाजपच्या दोन फुटीर सदस्यांच्या पाठिंब्यावर उपसभापतीपद महाविकास आघाडीचे अनिल आमटवणे यांच्याकडे आहे. सभापती निवडीत गीतांजली कणसे यांनी माघार घेतल्याने खवाटे यांची बिनविरोध निवड झाली होती. त्रिशला खवाटे यांनी ५ मे रोजी पाच महिन्यांचा कालावधी पूर्ण होताच आपल्या कारकीर्दीवर समाधानी असल्याचे स्पष्ट करीत स्वत: भाजप नेत्याकडे राजीनाम्याची तयारी दर्शविली. खासदार संजयकाका पाटील, आमदार सुरेश खाडे यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत पक्षाने खवाटे यांना राजीनामा
देण्याचा आदेश दिला. यानंतर लगेचच खवाटे यांनी विक्रम पाटील, काकासाहेब धामणे, दिलीपकुमार पाटील, बाजार समितीचे संचालक उमेश पाटील, आनंदा भोई, विष्णू कणसे यांच्या उपस्थितीत
जिल्हा परिषद अध्यक्षा प्राजक्ता कोरे यांच्याकडे राजीनामा दिला. सभापती पदासाठी भाजपच्या गीतांजली कणसे यांचे नाव निश्चित झाले आहे. त्यांच्या बिनविरोध निवडीसाठी भाजप नेत्यांचे प्रयत्न सुरू आहेत. भाजपच्या दोन फुटीर सदस्यांपैकी एक सदस्य स्वगृही परतल्याने कणसे यांचीच सभापतीपदी निवड होणार, असा दावा कणसे यांचे समर्थक करीत आहेत. या निवडीत महाविकास आघाडी कोणती भूमिका घेणार, याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे.
चौकट
आमटवणे यांना प्रभारी सभापतिपदाची संधी
त्रिशला खवाटे यांच्या राजीनाम्यामुळे नवीन सभापती निवडीला पंधरा ते वीस दिवसांचा अवधी लागणार आहे. परिणामी रिक्त झालेल्या सभापतिपदाचा प्रभारी कारभार उपसभापती अनिल आमटवणे यांच्याकडे जाणार आहे.