जिल्ह्यात वाढत्या कोरोना रुग्णांच्या पार्श्वभूमीवर मिरज शासकीय रुग्णालयात बेड वाढवणे व मुबलक ऑक्सिजन पुरवठा करण्याची मागणी होत आहे. रुग्णालयात सध्या उपचार घेणाऱ्या चिंताजनक रुग्णांची परिस्थिती पाहता अतिदक्षता विभागात तातडीने ३० बेड वाढविण्याचे आदेश जिल्हाधिकारी डॉ. अभिजित चौधरी यांनी दिले. मंगळवारी सायंकाळी जिल्हाधिकाऱ्यांनी मिरज शासकीय कोरोना रुग्णालयाला भेट देऊन कामकाजाचा आढावा घेतला.
गेल्या महिनाभरात सांगली जिल्ह्यात कोरोनाचा कहर सुरू असून दररोज दीड हजार नव्या रुग्णांची भर पडत आहे. मिरज शासकीय रुग्णालयात ३८० रुग्ण उपचार घेत असून यापैकी २५० रुग्ण अतिदक्षता विभागात आहेत. उर्वरित रुग्णही व्हेंटिलेटरवर आहेत. चिंताजनक स्थितीत असलेल्या आणखी काही रुग्णांना अतिदक्षता विभागात ठेवण्याची आवश्यकता आहे. मात्र, अतिदक्षता विभागात बेड शिल्लक नसल्याने गैरसोय होत आहे. त्यामुळे ऑक्सिजन व अतिदक्षता विभागात बेडची संख्या वाढवावी. मुबलक ऑक्सिजन पुरवठ्यासाठी उपाययोजना कराव्यात, अशी मागणी होत आहे.
पालकमंत्री जयंत पाटील व जिल्हा प्रशासनाच्या झालेल्या कोविड आढावा बैठकीतही मिरज सिव्हिलमध्ये बेड वाढविण्याबाबत सूचना देण्यात आल्या आहेत. याअनुषंगाने जिल्हाधिकारी डॉ. अभिजित चौधरी यांनी मिरज सिव्हिल रुग्णालयास भेट देऊन उपचार व्यवस्थेचा आढावा घेतला. रुग्णालयातील अतिदक्षता विभागात तातडीने ३० बेड वाढविण्याच्या सूचना त्यांनी दिल्या. यावेळी अन्न व औषध प्रशासनाचे निरीक्षक भांडारकर, रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. सुधीर नणंदकर यांच्यासह वैद्यकीय अधिकारी उपस्थित होते.