सांगली : मिरज परिसरातील गुंडेवाडी, म्हैसाळ परिसरात चोरी करणाऱ्या अल्पवयीनास स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने ताब्यात घेतले. त्याच्याकडून मोबाइल, रोख रक्कम असा ३२ हजार ६०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
घरफोडी, चोरीच्या गुन्ह्यातील आरोपींवर कारवाई करण्यासाठी एलसीबीचे पथक मिरज परिसरात गस्तीवर होते. यावेळी मिरज-बेडग मार्गावर वड्डी फाटा येथे एक अल्पवयीन मुलगा संशयास्पदरीत्या उभा होता. याची माहिती पथकाला मिळताच पथकाने त्याची विचारपूस केली. त्यात त्याने साथीदार पोरा उर्फ पोऱ्या शिंदे, समीगऱ्या भोसले, भारत कणक्या भोसले आदींसोबत गुंडेवाडी येथे एका ग्रीन हाऊनमधून दोन मोबाइल व रोख दोन हजार चोरले होते, तर मिरज म्हैसाळ रोडवरील एका पेट्रोल पंपावरील केबीनमध्ये घुसून तेथील कपड्यांच्या खिशातून दोन मोबाइल व रकमेची चोरी केली होती. यातील वाटणी म्हणून २६०० रुपये व दोन मोबाइल आल्याचेही त्याने सांगितले. त्याच्याकडून दोन मोबाइल व रोख २६०० रुपये, असा ३२ हजार ६०० रुपयांचा माल जप्त करण्यात आला आहे.
पोलीस निरीक्षक सर्जेराव गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली दिलीप ढेरे, जितेंद्र जाधव, सचिन कनप, शशिकांत जाधव आदींच्या पथकाने ही कारवाई केली.