आष्टा : वाळवा तालुक्यातील अल्पवयीन मुलीवर बंदुकीने गोळ्या घालण्याची धमकी देत लैंगिक अत्याचार केल्याची घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी संशयित साजन नारायण अवघडे (रा. डांगे कॉलेजजवळ, आष्टा, ता. वाळवा) याच्याविरुद्ध आष्टा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.पोलिसांनी दिलेली माहिती अशी, तालुक्यातील एका १७ वर्षीय युवतीचे तिच्या आईबरोबर दि. ४ रोजी सकाळी १० च्या दरम्यान घरगुती कारणावरून भांडण झाले. त्यानंतर युवती रागाच्या भरात घरातून बाहेर पडली. ती एका मंदिरासमोर जाऊन बसली होती.
दुपारी बारादरम्यान साजन अवघडे हा मोपेडवरून तेथे आला. युवतीला एका खोलीत घेऊन गेला. युवतीशी अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न करताच तिने विरोध केला. तेव्हा तिला मी सांगतो तसेच कर, तसे केले नाहीस तर माझ्या जवळील बंदुकीने तुला गोळ्या घालीन, अशी धमकी दिली. त्यानंतर तिच्यावर लैंगिक अत्याचार केला. पीडित युवती रडत असताना या प्रकाराबाबत कोणाला बोललीस तर तुला व तुझ्या घरातील लोकांना गोळ्या घालीन, अशी धमकी दिली. साडेचारदरम्यान त्याच मंदिराजवळ तिला सोडून गेला. पीडित युवतीने घरात हा प्रकार सांगितला. त्यानंतर तिच्या मावशीने पोलिसांत अवघडे याच्यावर गुन्हा दाखल केला आहे. सहायक पोलिस उपनिरीक्षक एस. एस. यादव तपास करीत आहेत.