मिरजेत ड्रेनेजचे काम निकृष्ट मिरज : मिरजेतील रखडलेल्या ड्रेनेजबाबत सदस्यांनी आक्रमक पवित्रा घेत ठेकेदाराला धारेवर धरले. आयुक्त रवींद्र खेबूडकर यांनी ठेकेदारास तात्काळ काम सुरू करण्याचे व काम सुरू न झाल्यास ठेकेदारावर दंडात्मक कारवाईचा आदेश दिले. मिरजेतील सुधारित ड्रेनेज योजनेचे काम गेली दोन वर्षे रखडले आहे. ड्रेनेज योजनेचे काम निकृष्ट दर्जाचे व आराखड्याप्रमाणे करण्यात आले नसल्याची सदस्यांची तक्रार आहे. रखडलेल्या कामाबाबत आज मिरज कार्यालयात आयुक्त रवींद्र खेबूडकर व महापौर हारुण शिकलगार यांच्या उपस्थितीत बैठक पार पडली. ड्रेनेज योजनेचे ठेकेदार बी. एस. बुटाले बैठकीस उपस्थित होते. ड्रेनेज योजनेचे ४० टक्के काम पूर्ण झाले असून, पुढील कामाचा तांत्रिक आराखडा मिळाला नसल्याने काम थांबल्याचे स्पष्टीकरण ठेकेदाराने दिले. कामे पूर्ण होण्याअगोदरच ठेकेदारास जादा कामाची बिले देण्यात आल्याची व आराखड्याप्रमाणे काम न करता चुकीच्या पध्दतीने काम करण्यात आल्याचा आरोप बसवेश्वर सातपुते यांनी केला. टाकळी रस्त्याच्या ड्रेनेज लाईनचे काम चुकीचे झाल्याची तक्रार अनिलभाऊ कुलकर्णी यांनी केली. सुरेश आवटी यांनी आक्रमक पवित्रा घेत ड्रेनेजअभावी नागरिकांचे हाल होत असल्याचे सांगत, ठेकेदारास धारेवर धरले. योजनेचे काम अनेक ठिकाणी चुकीचे झाले असून, त्यापेक्षा जुनी ड्रेनेज वाहिनी चांगली असल्याचे सदस्यांनी सांगितले. अण्णा भाऊ साठे पुतळ्याजवळ ड्रेनेज योजनेची ट्रायल घेण्याचे व गुलाबराव पाटील महाविद्यालय ते सदासुख हॉटेलपर्यंत ड्रेनेज वाहिनीचे काम एका महिन्यात पूर्ण करण्याचे आदेश आयुक्तांनी दिले. ठेकेदाराने २ जानेवारीपासून काम पुन्हा सुरू करण्याचे मान्य केले. मार्चपर्यंत ड्रेनेज काम सुरू झाले नाही, तर प्रतिदिन पाच हजार रुपये दंड वसूल करण्याचे आदेश आयुक्तांनी प्रशासनाला दिले. माजी महापौर किशोर जामदार, पांडुरंग कोरे, शिवाजी दुर्वे, संजय मेंढे, शुभांगी देवमाने यांच्यासह सदस्य बैठकीस उपस्थित होते. (वार्ताहर)