कडेगाव : मराठा आरक्षणाच्या मागणीला आता निर्णायक वळण लागले आहे. अंतरवली सराटी येथून मुंबईकडे निघालेल्या भव्य मोर्चात सहभागी होण्यासाठी तालुक्यातील प्रत्येक गावातून हजारोंच्या संख्येने बांधव मुंबईकडे रवाना झाले.“आरक्षण आमच्या हक्काचे, नाही कुणाच्या बापाचे”, “छत्रपती शिवाजी महाराज की जय”, “मनोज जरांगे पाटील तुम्ह आगे बढो – हम तुम्हारे साथ है” या गर्जनांनी कडेगाव शहर अक्षरशः दणाणून गेले. गावोगावी जमलेले बांधव एकवटले आणि एका अखंड लाटेच्या स्वरूपात मुंबईच्या दिशेने कूच करत निघाले. काही बांधव थेट कराडमार्गे मुंबईकडे गेले, तर उर्वरितांनी कडेगावच्या हृदयातून रॅलीच्या रूपाने प्रवास सुरू केला.हातात भगवे झेंडे, डोक्यावर भगव्या टोप्या, खांद्यावर भगवा टॉवेल या परंपरागत परंतु जाज्वल्य वेशभूषेत निघालेल्या मराठा बांधवांच्या डोळ्यांत फक्त एकच ज्वाला पेटलेली दिसत होती “आरक्षण मिळाल्याशिवाय माघार नाही.” त्यांच्या चेहऱ्यांवर जिद्दीचा तेजस्वी प्रकाश झळकत होता, तर ओठांवर अखंड घुमत होती एकच घोषणा – “चलो मुंबई!”
Maratha Reservation: मनोज जरांगे-पाटील यांच्या हाकेला उत्स्फूर्त प्रतिसाद, कडेगावातून मराठा बांधवांची मुंबईकडे कूच
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 28, 2025 14:53 IST